श्रीपंत महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात प्रारंभ
वार्ताहर/सांबरा
कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 120 व्या पुण्यतिथी उत्सवाला बुधवारी प्रेमध्वज मिरवणुकीने प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी 8 वाजता बेळगाव शहरातील समादेवी गल्लीतील श्रीपंत वाडा येथून प्रेमध्वज मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीपंत घराण्यातील मान्यवर मंडळींनी पालखीचे पूजन करून मिरवणुकीस चालना दिली. त्यानंतर मिरवणूक बेळगाव शहरातील खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, हेमूकलानी चौक, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, जुना पी. बी. रोड, किल्ला, गांधीनगरमार्गे निघाली.
गारगोटी येथून आलेल्या पायीदिंडीचे स्वागत
दरवर्षी गारगोटी ते पंत बाळेकुंद्री पायी दिंडी काढली जाते. पायी दिंडीचे आगमन सकाळी 11 वाजता गांधीनगर येथे झाले. यावेळी पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. पायी दिंडीही प्रेमध्वज मिरवणुकीमध्ये सहभागी झाली. त्यानंतर प्रेमध्वज मिरवणूक सांबरामार्गे मार्गस्थ झाली. प्रेमध्वज मिरवणुकीचे सांबरा रोडवरील हरी ओम एंटरप्राईजेस येथे भव्य स्वागत करून भक्तांच्या अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती.
मुतगा येथे प्रेमध्वज मिरवणुकीचे स्वागत
दुपारी मुतगे येथे प्रेमध्वज व पालखीचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मेन रोड ते गावातील मारुती मंदिरपर्यंत मिरवणूक नेण्यात आली. यावेळी प्रेमध्वजाचे पूजन ग्रा. पं. माजी सदस्य मारुती पाटील यांनी केले. पालखीचे पूजन भाऊ देसाई यांनी केले. यावेळी सामूहिक आरती करण्यात आली. याप्रसंगी गावातील असंख्य भक्त उपस्थित होते. त्यानंतर प्रेमध्वज मिरवणूक श्रीपंत नामाच्या गजरात दुपारी पंत बाळेकुंद्री येथील वाड्यामध्ये पोहोचली. सायंकाळी 5 वाजता श्रीपंतवाडा येथून प्रेमध्वज मिरवणूक निघाली. रात्री 8 वाजता प्रेम ध्वजारोहण होऊन मुख्य उत्सवाला सुरुवात झाली.
अखंड भजन सेवा
कर्नाटक व महाराष्ट्रातील भक्तपंत बाळेकुंद्रीत दाखल होऊ लागले आहेत. गुरुवारी पालखी सेवेला भक्तांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. आलेल्या भक्तांकडून पंतपदावर आधारित अखंड भजन सेवा सुरू आहे.
उत्सवाचा आज मुख्य दिवस
गुरुवार दि. 9 रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असून पहाटे 5 वाजता श्रींचा पुण्यस्मरण कार्यक्रम होईल. सकाळी 7 वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून समारंभाने निघून 2 प्रहरी आमराईतील श्रीपंतस्थानी येईल व रात्री 8 ते 12 या वेळेत पालखी सेवा होईल. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये लाखो भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीने श्रीदत्त संस्थानकडून जय्यत तयारी केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर भक्तांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्यावतीने शहर बसस्थानक येथून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.