श्रीपंत महाराज पुण्यतिथी उत्सव आजपासून
वार्ताहर/सांबरा
कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 119 व्या पुण्यतिथी उत्सवाला शुक्रवार 18 रोजी प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी 8 वा. बेळगाव शहरातील समादेवी गल्लीतील पंतवाडा येथून प्रेमध्वज मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. विधीवत पूजनानंतर प्रेमध्वज मिरवणूक बेळगावातील विविध मार्गांवरून जात पंतबाळेकुंद्रीकडे मार्गस्थ होणार आहे. प्रेमध्वज मिरवणूक बाळेकुंद्रीतील पंतवाड्यात सायंकाळी 4 च्या सुमारास पोहचेल. रात्री 8 वा. प्रेमध्वजारोहण होऊन उत्सवाला प्रारंभ होईल. भक्तांच्या सोयीसाठी मेन रोडनजीक पार्किंगची व्यवस्था केली आहे. राज्य परिवहन मंडळामार्फत यात्रा काळात जादा बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे कळविले आहे. यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या लाखो भक्तांसाठी 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 पासून 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 पर्यंत सौ. यमुनाक्का मुक्त अन्नछत्रच्या माध्यमातून 24 तास चहा, नाश्ता व जेवण मोफत उपलब्ध होणार आहे. तरी पंतभक्तांनी उपस्थित राहावे, असे श्रीदत्त संस्थानच्यावतीने कळविण्यात आले आहे.
आजपासून जादा बस
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-पंतबाळेकुंद्री मार्गावर यात्रा विशेष बस शुक्रवारपासून धावणार आहेत. पंतबाळेकुंद्री येथील श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा 119 वा पुण्यतिथी उत्सव दि. 18 ते 20 दरम्यान होणार आहे. यासाठी ही अतिरिक्त बससेवा सोडली जाणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत ही यात्रा विशेष बस धावणार आहे. या मार्गावर अतिरिक्त 25 बसेस सोडल्या जाणार आहेत. शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू असला तरी इतरांसाठी 25 रुपये फुल तर लहानांसाठी 10 रुपये तिकीट आकारणी केली जाणार आहे.
रेल्वे स्टेशन विशेष बस
पंतबाळेकुंद्री यात्रेसाठी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथून येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. यासाठी यात्रा काळात रेल्वे स्टेशनहून पंतबाळेकुंद्रीला यात्रा विशेष बसची व्यवस्था केली जाणार आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष बस उपलब्ध होणार आहे. रेल्वे स्टेशन ते पंतबाळेकुंद्री 40 रुपये फुल तर लहानांसाठी 20 रुपये तिकीट राहणार आहे.