For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर गोव्यातून पुन्हा श्रीपादभाऊच!

12:37 PM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तर गोव्यातून पुन्हा श्रीपादभाऊच
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्ट संकेत : उत्तर गोवा प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

Advertisement

म्हापसा : उत्तर गोव्यासाठी भाजपतर्फे लोकांना हवा तोच उमेदवार दिला जाईल. हा उमेदवार कोण हे लोकांना ठाऊकच आहे, असे सांगून उमेदवारी श्रीपादभाऊ नाईक यांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उत्तर गोव्याच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे काल बुधवारी म्हापशात उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की उमेदवाराची घोषणा पक्षाकडून लवकरच अधिकृतरित्या दिल्लीतून केली जाणार आहे. आपणा सर्वांना उमेदवार कोण हे माहीत आहेच. आपणासही उमेदवार कोण हे माहीत असूनही त्याची घोषणा आपण करू शकत नाही, केंद्राकडून ती लवकरच केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आमदार, मंत्री, कार्यकर्त्यांची गर्दी

Advertisement

या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार जेनिफर मोन्सेरात, डॉ. दिव्या राणे, प्रवीण आर्लेकर, प्रेमेंद्र शेट, केदार नाईक, मायकल लोबो, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई तसेच मगोपचे आमदार जीत आरोलकर, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटये उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी, माजी आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.

मोदींकडून गोव्याला तीस हजारांचा निधी

मागील 10 वर्षात केंद्राकडून राज्य सरकारला 30 हजाराहून जास्त कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी देण्यात आला. त्यातून अनेक विकास प्रकल्प हाती घेण्यात आले. केंद्रात तसेच राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारमुळे हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी सदानंद तानावडे, रोहन खंवटे, श्रीपाद नाईक, नीळकंठ हळर्णकर, मायकल लोबो आदी नेत्यांची जोषपूर्ण भाषणे झाली. पक्षाचे महासचिव राजसिंग राणे यांनी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन केले.

 काँग्रेस दीड लाखाच्या मताधिक्क्याने पराभूत होणार

काँग्रेस पक्ष दीड लाखाच्या मताधिक्याने पराभूत होणार म्हणून उमेदवारी अर्ज भरायलाही मागेपुढे केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि राज्यातून काँग्रेसचा नायनाट करण्यासाठी गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतून भरघोस मतांनी भाजपला विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Advertisement
Tags :

.