भारत-सिंगापूर वीज जोडणीच्या प्रस्तावाला महत्त्व; प्रादेशिक ऊर्जा व्यापाराला चालना : केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक
भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचा आणि आसियानसोबतच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा उल्लेख करताना नाईक यांनी ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. आसियान ऊर्जा सहकार्यासाठी कृती आराखडा 2026-2030 आणि आसियान-भारत कृती आराखडा 2026-2030 यांच्या माध्यमातून सहकार्याला नवी दिशा देता येईल, असे त्यांनी नमूद केले.
आसियान पॉवर ग्रीड, प्रादेशिक वीज पारेषण व्यवस्था, बहुपक्षीय वीज व्यापार, स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षा ही भारत-आसियान सहकार्याची महत्त्वाची क्षेत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये 22व्या आसियान-भारत शिखर परिषदेत आसियान पॉवर ग्रीडसाठी 400 व्यावसायिकांना ग्रीड जोडणीचे प्रशिक्षण देण्याची घोषणा केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
बिगर-जीवाश्म ऊर्जेत भारताची मोठी झेप
भारताने जून 2025 मध्ये एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेपैकी 50 टक्के क्षमता बिगर-जीवाश्म ऊर्जा स्रोतांमधून साध्य केली. हे यश २०३० साठी निर्धारित राष्ट्रीय उद्दिष्टापेक्षा पाच वर्षे आधी मिळाल्याचे नाईक यांनी अधोरेखित केले. नवीकरणीय ऊर्जा विकास, ग्रीड एकत्रीकरण, पारेषण नियोजन, ऊर्जा साठवणूक, हरित हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानातील भारताचा अनुभव पूर्व आशियातील देशांसोबत सामायिक करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.
भारत-सिंगापूर वीज जोडणीचा प्रस्ताव
भारत आणि सिंगापूर यांच्यात 2,000 मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित सीमापार वीज जोडणीच्या विविध पर्यायांचा विचार सुरू असल्याचे नाईक यांनी नमूद केले. यामध्ये म्यानमार, थायलंड आणि मलेशियामार्गे इंफाळ ते सिंगापूरदरम्यान सुमारे 3,000 किलोमीटर लांबीचा पारेषण मार्ग उभारण्याच्या पर्यायाचाही समावेश आहे.
या प्रस्तावित जोडणीमुळे सीमापार वीज व्यापाराला चालना मिळण्यासोबतच स्वच्छ ऊर्जेचे एकत्रीकरण आणि प्रादेशिक ऊर्जा सुरक्षा मजबूत होण्यास मदत होऊ शकते.
बहुपक्षीय वीज व्यापाराला भारताचा पाठिंबा
आसियान पॉवर ग्रीडसंदर्भातील सुधारित सामंजस्य कराराची अंमलबजावणी आणि बहुपक्षीय वीज व्यापाराचा विस्तार करण्याच्या आसियानच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा कायम राहील, असे श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक सहकार्याच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्र अधिक सुरक्षित, परवडणारे आणि शाश्वत बनविण्यासाठी भारत सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.