For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑक्टोबरला आरोग्य शिबिरांसह विविध कार्यक्रम

10:22 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑक्टोबरला आरोग्य शिबिरांसह विविध कार्यक्रम
Advertisement

पणजी : केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री तथा लोकनेते श्रीपाद येसो नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा यांच्या वतीने रविवार, 4 ऑक्टोबर रोजी विविध लोककल्याणकारी, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सांपेंद्र, जुने गोवे येथील श्रीपाद नाईक यांच्या निवासस्थानी दिवसभर हे कार्यक्रम होणार आहेत.

Advertisement

वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात नागरिकांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, सकाळपासून विविध मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नागरिकांना विविध आरोग्यसेवा आणि तपासणीचा लाभ घेता येणार आहे.

राज्यपालांच्या उपस्थितीत वैद्यकीय कार्यक्रमाचे उद्घाटन

वैद्यकीय कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 9.30 वाजता राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि गोवा भाजपचे अध्यक्ष दामू नाईक हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

विविध मोफत आरोग्य तपासण्या

या आरोग्य उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी विविध प्रकारच्या तपासण्या आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रसाद नेत्रालय सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, उडुपी यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी तसेच चष्मे वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

डेंटल कॉलेज, बांबोळी यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, धारगळ यांच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक वैद्यकीय तपासणी तसेच औषध वितरणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कर्करोग व मधुमेहाशी संबंधित तपासणी

‘कॅन्सर-फ्री गोवा’ अभियानांतर्गत आयआरसीसी-डी आणि रिजॉईस हेल्थ फाऊंडेशन, रिजॉईस हेल्थ यांच्या सहकार्याने कर्करोगाची मोफत तपासणी तसेच आवश्यक औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय आरटेलसच्या सहकार्याने डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्यसेवेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. फंडस कॅमेरा आणि ओसीटी मशीनच्या साहाय्याने डोळ्यांशी संबंधित आजारांची तपासणी करण्यात येणार असल्याने मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या गुंतागुंतींचे वेळेवर निदान करण्यास मदत होणार आहे.

‘स्वर आले दुरुनी’ने होणार कार्यक्रमाचा समारोप

दिवसभर चालणाऱ्या लोककल्याणकारी आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांची सांगता सायंकाळी 7 ते 9.30 या वेळेत होणाऱ्या ‘स्वर आले दुरुनी’ या विशेष संगीत कार्यक्रमाने होणार आहे.

युवा संगीतकार धनराज मडकईकर यांच्या सादरीकरणातून रंगणाऱ्या या संगीत संध्येत भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते तसेच सदाबहार चित्रपट गीतांचा नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे. तेजस वेर्णेकर, विभा अलगुंडगी, समृद्ध चोडणकर आणि धनराज मडकईकर हे गायक या कार्यक्रमात सहभागी होणार असून संगीत संयोजनाची जबाबदारीही ते सांभाळणार आहेत.

श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून आरोग्यसेवा, समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांचा संगम साधण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मोफत आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.