मुख्यमंत्री नेत्यांचं पॅचअप करतील पण जनतेचं नाही; आमदार सतेज पाटील
कोल्हापूरची स्वाभिमानी जनता श्रीमंत शाहू छत्रपतींच्या पाठीशी; महायुतीचे उमेदवार त्यांच्याच घटक पक्षांना मान्य नसल्याचा केला आरोप
महायुतीच्या जिल्ह्यातील दोनही उमेदवारांबाबत त्यांच्याच नेत्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवस कोल्हापूरात थांबावं लागलं. यावरुन उमेदवारांची निष्क्रीयता दिसून येत असून महायुतीचे जिल्ह्यातील दोनही उमेदवार त्यांच्याच घटक पक्षांना मान्य नसल्याचा असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. तसेच कोल्हापुरची स्वाभिमानी जनता श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या पाठीशी ठामपण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांच पॅचअप करतील पण जनतेच पॅचअप ते करु शकणार नाहीत, असेही आमदार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या रॅली दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
आमदार पाटील म्हणाले, श्रीमंत शाहू छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरची जनता मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरली आहे. कोल्हापूरच जनमत हे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच आहे. जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. जनतेमधील उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती उमेदवारी अर्ज भरत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
स्वाभिमानी रयत शाहू छत्रपतींच्या पाठीशी : मालोजीराजे छत्रपती
कोल्हापूर जिह्यातील स्वाभिमानी रयत श्रीमंत शाहू छत्रपतींच्या पाठिशी आहे. कोण काय बोलतंय याकडे आम्ही लक्ष देत नाही, त्यांना उत्तर द्यायला कोल्हापूरची स्वाभिमानी जनता तयार आहे. ही वैचारिक लढाई आहे. श्रीमंत शाहू छत्रपतींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिह्याच्या कानाकोपऱ्यातून आघाडीतील घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित आहेत. जनतेच्या मनात जे आहे ते आजच्या शक्तीप्रदर्शनामधून दिसून आले आहे. शाहूंची विचारधारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यायचे आहेत. मतदारांमध्ये उत्साह आहे, त्यामुळे ते श्रीमंत शाहू छत्रपती यांना विजयी करत बदल घडविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.