10 मे रोजी झळकणार ‘श्रीकांत’
राजकुमार रावच्या अभिनयाची भुरळ
विक्रांत मैसीच्या ‘12वी फेल’प्रमाणे राजकुमार रावचा चित्रपट ‘श्रीकांत’ मोठा पडदा गाजविणार आहे. ‘श्रीकांत’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कहाणी प्रसिद्ध उद्योजक श्ऱीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित आहे. यात राजकुमार राव हा श्रीकांत यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. बोलँट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट व्हिज्युअली चॅलेंज्ड मुलाची कहाणी दर्शविणारा आहे.
जन्मापासून दिव्यांग असूनही मोठी स्वप्नं पाहणारा हा मुलगा इतरांपेक्षा खूप वेगळा परंतु अभ्यासात प्रचंड हुशार असतो. परंतु त्याला कमी लेखणारे आणि त्याची थट्टा करणारे देखील त्याच्या वाटचालीत अडथळे टरतात, परंतु त्याला स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यापासून कुणीच रोखू शकत नसल्याचे दाखविण्यात येणार आहे.
12 वीमध्ये श्रीकांत यांना 98 टक्के गुण मिळाले होते आणि त्याला विज्ञान शाखेत शिक्षण घ्यायचे असते, परंतु तत्कालीन भारतीय शिक्षण व्यवस्थेत व्हिज्युअली चॅलेंज्ड मुलांना विज्ञान शाखेचा पर्याय घेता येत नव्हता. यानंतर श्रीकांत हे भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीकांत यांना जगातील सर्वात प्रसिद्ध कॉलेज मॅसाच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने निमंत्रित केले होते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी श्रीकांत यांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली होती. श्रीकांत यांची कहाणी अत्यंत मनस्पर्शी आणि दमदार देखील आहे.
या चित्रपटात राजकुमार राव यांच्यासोबत ज्योतिका देखील दिसून येणार आहे. याचबरोबर अलाया एफ तसेच शरद केळकर एका खास भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. तर निर्मिती टी-सीरिजकडून करण्यात आली आहे. हा चित्रपट 10 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.