श्रीराम पुतळ्याचे उद्या लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास उपस्थिती : सार्ध पंचशताब्दीनिमित्ति दहा दिवसीय महोत्सव, देशभरातील अनेक स्वामीजींची पावन उपस्थिती
पणजी : संपूर्ण आशिया खंडात गोव्याच्या लौकिकात भर घालणारे मानचिन्ह ठरेल अशा मर्यादापुऊषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण उद्या शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर रोजी काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती मठाच्या मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांनी दिली. मठाच्या स्थापनेस यंदा 550 वर्षे पूर्ण होत असल्याने या ‘सार्ध पंचशताब्दी’ महोत्सवाची माहिती देण्यासाठी काल बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महोत्सवाचे समन्वयक मंत्री दिगंबर कामत, उपाध्यक्ष शिवानंद साळगांवकर, आयोजन समितीचे उपाध्यक्ष प्रवास नायक आणि सचिव अनिल पै यांची उपस्थिती होती.
तब्बल 77 फुटी श्रीराममूर्ती
‘सार्ध पंचशतक’ महोत्सवाची सुऊवात आज दि. 27 पासून होत असून दि. 7 डिसेंबरपर्यंत 11 दिवस तो चालणार आहे. याच महोत्सवाचा भाग म्हणून मठाच्या परिसरात संपूर्ण आशिया खंडातील सर्वात उंच ठरेल असा तब्बल 77 फूट उंचीचा प्रभू श्रीरामचंद्रांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. श्रीरामांचा सदर पुतळा ब्राँझ धातूपासून बनविण्यात आला असून तो राम सूतार या जगप्रसिद्ध शिल्पकाराने तयार केला आहे.
हा सोहळा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक, सांस्कृतिक व तेवढाच ऐतिहासिक बनवण्यासाठी श्रीपालीमारू मठाचे अधिपती श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामीजी आणि पट्टशिष्य श्रीमद विद्याराजेश्वर तीर्थ स्वामीजी, तसेच श्रीसौनस्थान गौडपादाचार्य श्रीमान कावळे आणि श्रीमद्विद्याराजेश्वर तीर्थ स्वामीजी यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याशिवाय चित्रपूर मठधीश श्रीमद् सद्योजत शंकराश्रम स्वामीजी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या मान्यवरांच्या सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यपाल पशुपती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रीमंडळातील अन्य सदस्य आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित राहतील, असे धेंपो यांनी सांगितले. या ऐतिहासिक महोत्सवाची जागृती करण्याच्या उद्देशाने दोन महिन्यांपूर्वी बद्रीनाथ येथून मार्गस्थ झालेला प्रभू रामचंद्राचा रथ सुमारे 10 हजार किमी प्रवास करून बुधवारी पर्तगाळ मठात पोहोचला.
टपाल तिकिट, नाण्याचे अनावरण
पुतळ्याच्या लोकापर्णानंतर पंतप्रधान मोदी देवदर्शन करतील व नंतर सभेत संबोधित करणार आहेत. त्यावेळी त्यांच्याहस्ते टपाल खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीट आणि अर्थ खात्यातर्फे काढण्यात आलेल्या विशेष नाण्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
मोठ्याप्रमाणात भाविकांची सोय
या कार्यक्रमासाठी किमान 10 ते 12 हजार प्रेक्षकांची सोय होईल एवढ्या मोठ्या आकाराचा जर्मन मंडप उभारण्यात आला आहे. सोहळ्याचे औचित्य साधून पर्तगाळी मठासह सभोवताली परिसराचा संपूर्ण आध्यात्मिकदृष्ट्या कायापालट करण्यात आला असून रोज किमान 10 हजार लोक सामावू शकतील एवढा विस्तीर्ण परिसर विकसित करण्यात आला आहे. त्याशिवाय अन्य विविध साधनसुविधा निर्माण करण्यात आल्या असून त्या वैभवात श्रीरामाचा पूतळा भर घालणार आहे.
रामायण थीम पार्क, श्रीराम संग्रहालय
रामायण थीम पार्क आणि भगवान श्रीरामांना समर्पित 10 हजार चौरस फूट संग्रहालय उभारले जात आहे. यामध्ये भगवान रामाच्या विविध वयोगटातील प्रभावाचे परिणाम दाखवले जात आहेत. याशिवाय, पोस्टल स्टॅम्प, पोस्टल कव्हर, विजयनगर साम्राज्यातील नाणी आणि विविध शैलीतील चित्रे प्रदर्शित केली जात आहेत. हे सर्व भगवान रामांना समर्पित आहे, असे धेंपो म्हणाले.
जगप्रसिद्ध गायकांच्या मैफिली
धार्मिक विधीमध्ये रोज होम हवनादी विधी होतील. दहा दिवसात 550 हवन होतील. तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांसह अनुप जलोटा, शंकर महादेवन, मैथिली ठाकूर, महेश काळे यासारखे जगप्रसिद्ध कलाकार कला सादर करतील, असे त्यांनी सांगितले. या भरगच्च कार्यक्रमांच्या निमित्ताने राज्यभरातील लोकांनी येथे भेट देऊन हा सोहळा ‘याची देही’ पहावा व मठाच्या आदरातिथ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धेंपो यांनी केले. श्री. कामत यांनी बोलताना, मठाच्या 550 वर्षांच्या परंपरेशी सुसंगत उपक्रम म्हणून परमपूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींनी सुरू केलेला शारदा पंचशतकोटी श्रीराम नामजप अभियान हा एक प्रमुख आध्यात्मिक उपक्रम आहे. दि. 17 एप्रिल 2024 ते 18 ऑक्टोबर 2025 या 550 दिवसांच्या कालावधीत 550 कोटी वेळा पवित्र ‘श्री राम तारक महामंत्र‘ जप करण्यात आला.
काणकोणातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्तगाळ मठाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. 28 रोजी काणकोण येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेच्या कारणास्तव काणकोणमधील सरकारी, खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विशेष विद्यार्थ्यांच्या शाळा आदी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यासंबंधी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी आदेश जारी केला आहे.
जिवोत्तम मठ परिसरात हवाई वाहनांस बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने पर्तगाळी जिवोत्तम मठाच्या हवाई क्षेत्रात (ड्रोन) व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करण्यास व मानवरहीत कोणत्याही हवाई वाहनास 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते सायं. 6 या वेळेत बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हा न्यायदंडाधिकारी इगना क्लिटस यांनी हा आदेश जारी केला असून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-कलम 163 अंतर्गत हा आदेश काढण्यात आला आहे. हवाई क्षेत्रातील 2 कि. मी. अंतरातील परिसरात ही बंदी लागू आहे. आयएनएस हंसा ते पर्तगाळी व्हाया काणकोण राष्ट्रीय महामार्ग 66 तसेच पोळे चेकपोस्ट ते काणकोण, मडगाव ते काणकोण (करमल घाट) या क्षेत्रातही हा आदेश लागू असल्याचे त्यात म्हटले आहे.