इंगळी घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेनेची निदर्शने
मारहाण प्रकरणातील सर्वांना अटक करावी : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी येथे हिंदू युवकांना झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. प्रारंभी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये मानवी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला. सदर घटनेत सहभागी असलेल्या केवळ चार जणांनाच अटक करण्यात आली आहे. मात्र यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे संबंधितांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
हिंदू बांधवांना केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये अनेकजण सहभागी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्या सर्वांना अटक करण्यात यावी. यामधील प्रमुख आरोपींना तडीपार करण्यात यावे. मारहाण झालेल्या गोरक्षकांना उपचार, संरक्षण व परिहार देण्यात यावे. जिल्ह्यात बेकायदेशीररित्या सुरू असलेली गोहत्या, गोवाहतूक व कत्तलखाने बंद करावीत. गायींची व गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी गोशाळा आणि चेकपोस्ट उभारण्यात यावेत. आरटीओ, एपीएमसी व पोलीस अधिकारी गोवाहतुकीकडे दुर्लक्ष करत असून अशा अधिकाऱ्यांना निलंबित करावे. गोरक्षकांना सुरक्षा पुरविण्यात यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक, राज्याध्यक्ष गंगाधर कुलकर्णी, रवी कोकितकर यांच्यासह श्रीराम सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मानवी साखळी केल्यामुळे पोलिसांकडून राणी चन्नम्मा सर्कलमधील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. परिणामी काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचेही दिसून आले. खबरदारीच्या दृष्टीने पोलिसांकडून परिवहन मंडळाच्या बसेस व पोलीस वाहनेही तैनात ठेवली होती.