अवघा गोवा झाला श्रीराममय
पणजी : गोवा राज्यात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या राम मंदिरातून तसेच इतर मंदिरातही दुपारी 12 वा. रामजन्मोत्सव सोहळा झाला. त्यावेळी भाविकांनी मोठी गर्दी करुन रामजन्म साजरा केला तसेच विविध धार्मिक विधी, कार्यक्रमात सहभागी झाले. श्रीराम नवमीचा योग साधून गोव्यातील विविध मंदिरात भजन, कीर्तन तसेच नाटके आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लोकांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. राज्यातील श्रीराम मंदिरे फुलांनी तसेच वीजदिव्यांच्या माळांनी सजवण्यात आली होती.
रविवार सुट्टीचा दिवस लोकांनी विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरात सकाळपासूनच दर्शन व इतर धार्मिक विधींसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यात लहान मुले, वृद्ध, तरुण मंडळींसह महिला वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. अनेक मंदिरातून दुपारचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. त्याशिवाय सत्यनारायण पुजा, अभिषेक असे इतर उपक्रमही करण्यात आले. श्रीराम नवमीचा मोठा उत्सव कोलवाळच्या श्रीराम मंदिरात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक तसेच भाजपचे पदाधिकारी यांनी भाटले - पणजी येथील श्रीराम मंदिरात हजेरी लावली व तेथील भक्ती सोहळ्dयात ते सामील झाले. डॉ. सावंत यांनी श्रीराम नवमीनिमित्त उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. गोव्यात रामराज्य आहेच. ते अधिक सुराज्य बनावे म्हणून जनतेने भाजपला आशीर्वाद द्यावेत, असे ते म्हणाले.