तालुक्यात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात
गावा-गावातील विविध मंदिरांमध्ये काकड आरती, अभिषेक, पूजा, महाआरती, भजन कार्यक्रम
वार्ताहर/किणये
तालुक्यात रविवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावा-गावातील विविध मंदिरांमध्ये श्री रामनवमीनिमित्त पहाटे काकड आरती, अभिषेक, पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम झाले. दिवसभर झालेल्या विविध कार्यक्रमांमुळे तालुक्यात रामनामाचा जागर झाल्याचे पहावयास मिळाले. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची काही गावांमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ मृदंगाचा गजर झाला होता. रविवारी बहुतांशी मंदिरांमध्ये श्रीराम मूर्तीला अभिषेक करण्यात आला. विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दिवसभर भजन व इतर कार्यक्रम झाले. बहुतांशी गावांमध्ये प्रभू श्री राम यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचने व व्याख्यानांचे काय आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या होत्या.
रामदेव गल्ली, पिरनवाडी येथील श्री राम मंदिरात श्री राम लक्ष्मण सेवा संघ व श्री राम मंदिर व्यवस्थापन कमिटीतर्फे गेल्या पाच दिवसापासून राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला होता. रविवारी या सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सांगता झाली. रविवारी सकाळी मंदिरात अभिषेक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता व हनुमान या मूर्तींची विशेष पूजा करण्यात आली. दुपारी 12 वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी पाळणागीत म्हटले. त्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी श्री राम जय राम जय जय राम.... असा जयघोष करण्यात आला. यामुळे अवघी पिरनवाडी नगरी दुमदुमली होती.
पिरनवाडी भागात हे एकमेव श्री राम मंदिर असल्यामुळे दर्शनासाठी पंचक्रोशीतील भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहावयास मिळाली. रामनवमी सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली होती. तसेच विद्युत रोषणाई करून फुलांची सजावट केली होती. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. राम लक्ष्मण सेवा संघ व श्री राम मंदिर व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा हलगा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवनेरी चौक व मरगाई गल्ली हलगा यांच्यातर्फे रविवारी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी बालाजी काँक्रीटचे मालक सचिन सामजी यांच्या हस्ते श्री राम मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी विविध मान्यवरांची प्रभू श्री रामचंद्र यांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषणे झाली. त्यानंतर सर्वांसाठी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी युवक मंडळ व संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी हालगा विभाग प्रमुख प्रसाद धामणेकर, भाऊ देवलतकर, मारुती दंडकार, शिवाजी बेळगोजी, अमोल कामानाचे, ऋत्विक वासोजी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. बसवान गल्ली, देसूर येथील श्री राम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा गेल्या सात दिवसापासून सुरू होता. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काकड आरती व गुढी उभारून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. दि. 4 रोजी प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत टाळ मृदंगाचा गजर झाला. संपूर्ण गावभर ही मिरवणूक झाली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. दि. 5 रोजी श्री राम मंदिरसमोर रात्री कारलगा ता. खानापूर येथील संत एकनाथ महाराज सोंगी भारुडी भजन यांचा भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला.भजनाच्या माध्यमातून त्यांनी विविध अभंग सादर केले. सामाजिक नाट्याप्रयोगातून समाज प्रबोधन केले.
रविवार दि. 6 रोजी पहाटे मंदिरात काकड आरती केली. त्यानंतर पूजा केली. दुपारी बारा वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा केला. त्यानंतर महिलांनी पाळणागीत म्हटले. दिवसभर भजन व इतर कार्यक्रम झाले. सोमवार दि. 7 रोजी सायंकाळी सात ते रात्री 10 पर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रविवारी नावगे, सावगाव, बेळगुंदी, वाघवडे, मच्छे, किणये आदी गावांमध्ये रामनवमी साजरी करण्यात आली.
कणबर्गी ध. संभाजी चौकात श्री राम नवमीनिमित्त महाप्रसाद 
कणबर्गी येथे धर्मवीर संभाजी चौक श्री विठ्ठल रखुमाई मंदिरसमोर श्री राम नवमीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. प्रारंभी सकाळी नऊ वाजता प्रभू श्री रामाच्या मूर्तीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता श्री राम जन्मोत्सव व पाळणा झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर भजन सेवा व नामजप करण्यात आले. दुपारी एकनंतर पूजन करून महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी माजी महापौर शिवाजी सुंठकरसह मान्यवर मंडळी उपस्थित होती. परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
उचगाव येथे राममनवमी साजरी
येथे रामनवमीनिमित्त मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरातील राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी भजन, महिला भजन, तसेच मूर्तीवर अभिषेक, महाआरती, तीर्थप्रसाद असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. याचबरोबर नागेशनगर येथील मंडळातर्फे रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे भजन त्याचबरोबर राममूर्तीचे पूजन झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. यानिमित्त उचगाव ग्रामपंचायतच्या स्वच्छता कामगारांचा खास करून सत्कार यावेळी करण्यात आला. उमेश सुतार, चेतन सुतार, प्रकाश खोरागडे, सोमनाथ कंग्राळकर, निंगाप्पा लाळगे यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील भाविक व नागरिक, महिला उपस्थित होत्या.