हर-घर श्रीराम । शहर-शहर अयोध्या ।।
संपूर्ण देशात राम नामाचा गजर : रस्ते-बाजारपेठांना ‘भगवा’ साज : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, अयोध्या
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. अयोध्यानगरीत जल्लोषाचे वातावरण असतानाच आता संपूर्ण देशातही श्रीराम नामाचा गजर सुरू झाला आहे. घरोघरी श्रीरामपूजेची तयारी केली जात असतानाच आता गाव आणि शहरांमधील रस्त्यांनाही भगवा साज चढलेला दिसत आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला अयोध्येतील मंदिरात विराजमान होणार आहेत. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान असून देशभरातून 7000 हून अधिक पाहुणे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांमध्ये देशातील उद्योगपती, अभिनेते, साहित्यिकि आणि खेळाडूंचा समावेश आहे.
दिल्लीसह देशाच्या इतर भागातही लोक रामाच्या रंगात रंगलेले दिसतात. सर्वत्र रामनामाचा जयघोष होत आहे. रामाबद्दल लोकांमध्ये उत्साह आणि आनंद दिसत आहे. अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यापूर्वी देशभरात सुमारे 25 हजार मोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. बाजारात राम नावाच्या वस्तूंच्या विक्रीत तेजी आली आहे. श्रीराम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी देशात 1 लाख कोटी ऊपयांच्या आर्थिक उलाढालीचा अंदाज लावला जात आहे. हा आकडा अंदाजापेक्षा जास्त होण्याची शक्मयता आहे. 22 जानेवारी रोजी देशभरातील बाजारपेठांमध्ये महा दिवाळी साजरी होणार आहे.
देशातील हजारो लहान-मोठ्या व्यावसायिक संस्थांनी राम उत्सवाची जोरदार तयारी केली आहे. देशभरातील सर्व व्यापारी संघटना श्रीरामाच्या कार्यात सहभागी झाल्या. सर्वत्र श्री रामाच्या कार्यक्रमांचा जल्लोष सुरू आहे. देशभरात काही ठिकाणी शोभा यात्रा तर काही ठिकाणी पूजांचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण तर काही ठिकाणी रामसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
श्रीरामाच्या कीर्तन यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. अनेक शहरांमध्ये श्रीराम मंदिरे बांधली गेली आहेत. बाजारपेठा राम झेंड्यांनी सजल्या आहेत. 22 जानेवारीपूर्वीच ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यासाठी व्यापक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. श्रीरामाशी संबंधित वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. राम मंदिराच्या प्रतिकृती, राम ध्वज, राम पताका, हार, लॉकेट, हातातील बांगड्या किंवा श्रीरामाचे लॉकेट अशा वस्तूंना बाजारात मोठी मागणी आहे. फेटे, टोप्या, टी-शर्ट आणि कुर्ते आदींनाही मोठी मागणी आहे. मिठाई आणि अन्य पदार्थांची सोयही केली जात आहे.
अयोध्यानगरी सजली...
प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानांचे महत्त्वाचे सर्व विधी पूर्ण होत आले असून विशेष निमंत्रित अयोध्येत दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. अयोध्येत पूर्णपणे सज्जता बाळगली जात असून एटीएस, एनएसजी कमांडोंसह पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. राज्य पोलीसही सतर्क झाले आहेत. विद्युत रोषणाई आणि सजावटीने अयोध्यानगरी सजली असून आता सर्वांनाच मुख्य सोहळ्याची प्रतिक्षा आहे.