Solapur News | सोलापूरात श्री सदस्यांनी केली शासकीय कार्यालये, स्मशानभूमी चकाचक
स्वच्छता मोहीमेत , २,५०० श्री सदस्यांचा सहभाग
सोलापूर -रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये व स्मशानभूमीमध्ये सुमारे अडीच हजार श्री सदस्यांनी एकाचवेळी सकाळी सात ते दहा या वेळेत स्वच्छता मोहीम घेतली. यामुळे शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये व रमाशनभूमीचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसून आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने १ मार्च २०२६ रोजी सोलापूरात ही मोहीम घेण्यात आली. पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारीव डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गतच सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सर्व समाजाच्या स्मशानभूमी आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यामध्ये सोलापूर शहर व परिसरातील जवळपास २५ ठिकाणी स्वच्छता मोहीम श्री सदस्यांकडून करण्यात आली.
या अभियानात प्रतिष्ठानच्या वतीने एकूण ६३ वाहनांतून कचरा गोळा करुनत्याची महापालिका प्रशासनाच्या साहयाने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी ३५ ट्रॉली, १२ छोटा हत्ती, ४ टेम्पो, ७ डंपर, ३ अॅपेच्या माध्यमातून कचरा संकलीत करण्यात आला.
यावेळी शहर व शहर परिसरातील समर्थ बैठकीतील सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यासाठी सदस्यांनीच झाडू, फावडे, टिकाव, टोपली आदी साहित्य आणले होते. हॅन्डगोल्ज व मारक परिधान करुन यावेळी सदस्यांनी सर्वत्र स्वच्छता केली. शासकीय कार्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून अडगळीत असलेला मोठा कचरा यावेळी सदस्यांनी कशाचीही तमा न बाळगता केवळ काही तासात गोळा केला. त्यामुळे सोलापूरकरांतून या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत होते.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीडी सोलापूर शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवलेले आहेत. याशिवाय शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचे उत्तम संगोपन देखील केलेले आहे. जिल्ह्यामध्ये जलपुनर्भरणाचा उपक्रमही या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला आहे. कुंभारी येथील रे नगर येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वर्षापासून वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम सुरू आहे. यामध्ये जवळपास ३ हजार विविध वृक्षांचे लागवड व संगोपन चालू आहे.