श्री लईराई देवस्थान मृत-जखमींना करणार आर्थिक सहाय्य
सरकारी समितीचा अहवाल अद्याप मिळालाच नाही : देवस्थानावर विनाकारण आरोप करणारा अहवाल अमान्यच
अशी असेल आर्थिक मदत
- मृतांच्या कुटुंबियांना 1 लाख
- गभीर जखमींना 25 हजार
- किरकोळ जखमींना रू. 10 हजार
डिचोली : शिरगाव येथे श्री देवी लईराई जत्रोत्सवानंतर देवस्थान समिती व महाजनांमध्ये वर्ष परंपरेनुसार काल रविवारी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत देवस्थान समितीने सरकारच्या सत्यशोधन समितीने देवस्थान समितीवर लावलेले आरोप पुन्हा फेटाळून लावले. आरोप अमान्य असल्याचा पुनरूच्चार देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केला. तसेच बैठकीत चर्चा केल्यानंतर सर्व महाजनांच्या सहमतीने चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या धोंडगणांना आर्थिक सहाय्य देण्याचे ठरविण्यात आले. शिरगाव येथे देवस्थान समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीस देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी व महाजन मंडळी उपस्थित होती.
चेंगराचेंगरीवरुन आरोप - प्रत्त्यारोप
या बैठकीत प्रामुख्याने जत्रोत्सवात घडलेल्या प्रकारासंदर्भात चर्चा झाली. देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी समितीच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांना बैठकीत आक्षेप घेण्यात आला. तसेच त्यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात देवस्थान समितीला दोषी धरत समितीवर व अध्यक्षांवर केलेल्या आरोप फेटाळून लावण्यात आले. यावर माजी अध्यक्ष गणेश गावकर यांनी आपली बाजू मांडली. या विषयी सर्वांनी आपापले मुद्दे मांडल्यानंतर हा विषय जास्त ताणून न धरता वाढवू नये, असा सल्ला दिला. त्यामुळे या विषयावर अन्य एका बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. एका महाजनाने मामलेदार कार्यालयात निवेदन सादर करून ही समितीच बरखास्त करण्यची मागणी केली आहे, त्यावरही चर्चा करण्यात आली.
मृतात्म्यांना श्र्रध्दांजली, आर्थिक सहाय्य
जत्रोत्सवाच्या दिवशी शिरगावात झालेला चेंगराचेंगरीत बळी गेलेल्या सहाजणांच्या कुटुंबियांना देवस्थान समितीतर्फे रू. 1 लाख आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच गंभीर जखमींना रू. 25 हजार, तर किरकोळ जखमी झालेल्यांना रू. 10 हजार आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. बैठकीत सर्व महाजनांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत बळी पडलेल्या सहाही धोंडगणांना देवस्थान समितीतर्फे श्र्रध्दांजली वाहण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देवी श्री लईराईच्या मंदिरात देवस्थान समितीतर्फे लघुऊद्र करण्यात आले होते.
सत्यशोधन समितीचा अहवाल मिळालेला नाही
शिरगावात जत्रोत्सवात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल जाहीर होऊन आज कितीतरी दिवस उलटले आहेत. परंतु देवस्थान समितीच्या दाव्यानुसार हा अहवाल अद्यापही देवस्थान समितीच्या हाती आलेलाच नाही. या अहवालात देवस्थान समितीवर ठपका ठेवण्यासाठी कोणते मुद्दे नमूद केलेले आहेत, याची साधी कल्पनाही समितीला नसल्याने आम्ही त्यावर काहीच भाष्य करू शकत नाही. तरीही समितीवर दोष ठेवणारे मुद्यांचे स्पष्टीकरण देण्याची तयारीही समितीने ठेवली आहे. जत्रोत्सवाच्या आयोजनात समितीने काय केले व प्रशासन कुठे कमी पडले याचा सखोल अहवाल देवस्थान समिती सरकार व सत्यशोधन समितीसमोर मांडणार आहे, असे देवस्थान अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले.
देवस्थान समितीवर दोषारोप ठेवणे चुकीचेच
या जत्रोत्सवात देवस्थान समितीने सर्व पत्रव्यवहार वेळेतच केलेला आहे. डिचोली मामलेदारांनी जत्रोत्सवाच्या दोन दिवसांपूर्वी बैठक बोलावली होती. या दोन दिवसांत काय तयारी करू शकतो, याची सर्वांनी कल्पना करावी. तरीही देवस्थान समिती व महाजनांनी आपल्यापरीने सर्व ती तयारी केली. 30 एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक आले व त्यांनी पाहणी केली. होमकुंडस्थळी कळस जात असताना बेरिकेड्स घालणे शक्मय नसते. मंदिरात गणेश गावकर यांनी जत्रोत्सवाच्या दिवशी घातलेले बेरिकेडस महाजनांनी काढले होते. बाहेर घातलेल्या बेरिकेड्समुळे कितीतरी धोंडगण जखमी झाले होते.
तरीही सरकारी यंत्रणा जर हे बेरिकेड्स घालण्याची सक्ती करत असेल तर ती त्यांची जबाबदारी असणार आहे. जत्रोत्सवात बेरिकेड्सची गरज आहे असे म्हणतात ते खरे आहे, पण ते गर्दीपुढे शक्मय होत नाही. होमकुंडस्थळी पोलिसांबरोबरच आमचे महाजनही उपस्थित राहून धोंडगणांना व इतर लोकांवर नियंत्रण ठेऊन जत्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करतात. चेंगराचेंगरी घटनेवेळी घटनास्थळी अवघेच पोलिस होते. 250 पोलिस त्याठिकाणी असल्याचा दावा खोटा आहे, असेही यावेळी अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले.
जत्रोत्सवात धोंडगणांकडून होणाऱ्या गैरवर्तनावर अनेकांनी बोट ठेवले आहे. धोंडगणांच्या अरेरावी व बेजबाबदार वागणुकीमुळे शिरगावात होमकुंड मार्गक्रमणावेळी गोंधळ उडून चेंगराचेंगरीची घटना घडली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर देवस्थान समितीने सर्व धोंडगणांची नोंदणी करण्याची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार धोंडगणांना सतर्क केले जाणार असून जत्रोत्सवात कशा पध्दतीची वागणूक असावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक धोंडगणाकडे समिती पोहोचावी व त्यांना जत्रोत्सवाविषयी मार्गदर्शन व्हावे असा यामागचा हेतू असल्याचे यावेळी अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले.