महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीकृष्णांचा रथ बघताबघता ऊर्ध्वगतीने निघाला

06:40 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

समुद्राच्या तीरावर श्रीकृष्णांचा दिव्य रथ घेऊन सारथी दारूक त्यांची वाट पहात उभा होता. बराचवेळ झाला तरी त्याला श्रीकृष्णनाथ कुठे दिसले नाहीत. असे सहसा घडत नसे. ते नेहमी त्याला कुठे जातोय, किती वेळ लागेल ते सांगून जात असत. त्याचे त्यांच्यावर मनापासून प्रेम होते. त्यामुळे कासावीस होऊन तो त्यांच्या शोधार्थ निघाला. श्रीकृष्णाच्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत घेत तो सर्वत्र त्यांचा शोध घेऊ लागला.

Advertisement

तेव्हढ्यात त्याला भगवंताच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळांचा सुवास जाणवू लागला. त्या गंधाच्या वासाच्या अनुरोधाने तो त्यांच्या शोधार्थ पुढेपुढे जाऊ लागला. आणखीन थोडे पुढे गेल्यावर त्याने महातेजाचा प्रकाश बघितला. तसेच पुढे गेल्यावर धगधगीत तेजाचा गोळा असलेले, अश्वत्थातळी वीरासन घालून बसलेले घनसावळे श्रीकृष्ण दारूकाच्या दृष्टीस पडले.

श्रीकृष्णावरील आत्यंतिक प्रेमापोटी त्याने धावत जाऊन श्रीकृष्णाचे चरण पकडले. बराच वेळ श्रीकृष्णांना न बघितल्याने त्याची स्थिती अत्यंत शोचनीय झाली होती. त्याच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या होत्या. अंग थरथरा कापत होते. तो म्हणाला शार्ङ्गधरा तुम्ही दृष्टीस पडला नाहीत म्हंटल्यावर डोळ्यापुढे अंधार दाटून आला. ज्ञानालाच जर विवेकाने सोडले तर कणभरसुद्धा सुख प्राप्त होणार नाही. त्याप्रमाणे तुम्ही दिसत नाही असे होताच मी जड, मूढ झालो.

ज्याप्रमाणे चंद्र दिसत नसलेल्या अमावस्येच्या रात्री निबिड अंधार पडतो त्याप्रमाणे तुम्हाशिवाय श्रीहरि हे जग अंधकारमय दिसू लागले. जेव्हा सूर्याचे किरण निघतात तेव्हा अंधाराचा नाश होऊ लागतो. त्याप्रमाणे तुमचे श्रीचरण दिसताच माझ्या समोरील निबिड अंध:काराचा नायनाट झाला. अशाप्रकारे दारूक भगवंत त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे सांगत होता. त्याचवेळी एक परम आश्चर्य घडलं आणि दारूक अवाक होऊन ते अलौकिक दृश्य बघत राहिला. झालं असं की, देवांचा रथ सारथ्याशिवाय उडाला. चारही घोड्यांच्यासह गरुडध्वज असलेला श्रीकृष्णांचा रथ बघताबघता ऊर्ध्वगतीने निघाला. भगवंतांनी निजधामाला जाताना इहलोकी आपली कीर्ती फक्त मागे ठेवून स्वत:चे वैभव आणि संपत्ती त्यांच्याबरोबरच न्यायचे ठरवले होते. त्याप्रमाणे शंख, चक्र, गदा, कमळ ही भगवंतांची दिव्यायुधेही रथ गेला त्याच मार्गाने निघाली. रथाबरोबर सर्व दिव्यायुधेही निघाल्याचे पाहून अतिविस्मित झालेला दारूक तिथल्या तिथेच खिळून उभा राहिला.

भगवंतांनी स्वत:ची शक्ती वापरून आपली सगळी सत्ताकेंद्रे निजधामाला त्यांच्याआधी पाठवून दिली. ते पाहून चकित झालेला दारूक मनात म्हणाला, मी आत्तापर्यंत श्रीकृष्णाचा सारथी म्हणून काम केले. त्यांचा रथ मीच नेहमी चालवत असे. आत्ता मात्र श्रीकृष्णांनी स्वत: रथाला ऊर्ध्वगतीने निजधामाला पाठवून दिले आणि मला मात्र येथेच ठेवले. गोविंदाने आपली दिव्यायुद्धे सुद्धा निजधामाला पाठवली.

निश्चितच मी अभागी असल्याने मुकुंदाने माझा त्याग केला. मी रथाखाली उतरलो हाच माझा मुर्खपणा झाला. विनाशकाले विपरीतबुद्धी होते असे म्हणतात तेच माझ्याबाबतीत खरे झाले. मी सारथी होतो म्हंटल्यावर जोपर्यंत धन्याची आज्ञा होत नाही तोपर्यंत रथाखाली उतरायचे नाही हा नियम मी विसरलो. किती मी मंदमती! जर मी रथातून उतरलो नसतो तर मीही आपोआपच रथाबरोबर वर गेलो असतो. असे निरनिराळे विचार त्याच्या मनात येऊ लागले आणि आपल्यावर श्रीपती रुसलाय का? हा विचारही त्याला छळू लागला. ज्याने भगवंताच्या तळपायाला बाण मारला त्या जराव्याधाचाही देवांनी उद्धार केला. खरोखरच मी पूर्ण अभागी आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने माझा त्याग केला.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article