For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्णाने ब्रह्मसुखाचा उघड उघड सुकाळ केला

06:21 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्णाने ब्रह्मसुखाचा उघड उघड सुकाळ केला
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणतात, श्रीकृष्णावतार ज्ञानघन असल्याने भवबंधनच्छेदक असलेले त्याचे चरित्र अतिपावन समजले जाते. त्या श्रीकृष्णाची कृष्णकीर्ती जे आदराने आठवत राहतील आणि त्यावर चित्तात चिंतन करत राहतील त्यांच्या भवबंधनाची समाप्ती होते. श्रीकृष्ण कीर्तीमध्ये वैभव, वैराग्य ह्या दोन्हीचा समावेश आहे.

ज्याच्या मनामध्ये श्रीकृष्णकीर्ती वसत असते ते कळिकाळालासुद्धा भिक घालत नाहीत. श्रीकृष्णमूर्तीचे महात्म्य एव्हढे अगाध आहे की, अगदी आळसात दिवस काढणाऱ्या माणसाने जरी त्यांची आठवण काढली तर त्यांची सर्वच्यासर्व पापे भस्म होतात. जे सदा श्रीकृष्णकीर्ती गातात त्यांना चारही मुक्ती आंदण म्हणून मिळतात. श्रीकृष्णकीर्तीचे महात्म्यच असे परमपावन आहे की, त्यातील एक एक अक्षर महापातकाच्या सांभाराचे निर्दलन करते आणि स्मरण करणाऱ्याला मोक्षप्राप्ती होऊन त्याचा उद्धार होतो. असे नाम जगदुद्धारकारक आहे. तसं बघितलं तर नारायणाचे अनेक अवतार झालेले आहेत पण ह्या कृष्णावताराच्या ज्ञानप्राधान्य लीला पाहिल्या की, हे सगळे अगम्य आहे असा खुद्द ब्रह्मदेव अभिप्राय देतात. त्यांची सुरवात जन्मापासूनच होते.

Advertisement

त्यात रोज नित्यनवीन लीलेची म्हणजे चमत्काराची भर पडते. अर्थात हा नारायणाचा पूर्णावतार आहे असे अगदी थोड्या लोकांच्या लक्षात आले. हे ज्यांच्या लक्षात आले त्यांच्या दृष्टीने ब्रह्मसुखाचा उघड उघड सुकाळ झाला. ह्या परिपूर्ण ब्रह्म असलेल्या श्रीकृष्ण अवताराचे ज्ञानघन चरित्र जे पठण करतील ते सर्व उद्धरून जातील ह्यात नवल काहीच नाही. अशी ही पावन कृष्णकीर्ती जे वाचक वाचतील ते उद्धरून जातील. एव्हढेच नव्हे तर अन्य कुणी वाचत असताना त्याचे श्रवण करतील तर तेही भवसिंधु तरुन जातील. कलियुगात माणसे मंदमती असल्याने त्यांना भवसागर तरुन जायला श्रीकृष्णकीर्तीचे पठण व श्रवण करणे हा फारच सुगम उपाय आहे. ही अतिपावन असलेली श्रीकृष्णकीर्ती भागवतात जागोजागी वर्णन केली आहे, त्यातही भागवताच्या दहाव्या खंडात अतिगोड अशी श्रीकृष्णकीर्ती श्रीकृष्णाच्या जन्मदिवसापासून चढत्यावाढत्या श्रेणीने वर्णन केली आहे. दिनजनांना तारण्यासाठीच श्रीकृष्णाने त्याच्या कीर्तीचा विस्तार केला. त्याबाबत आता सविस्तर सांगतो. नर-नटाचा वेष घेऊन हृषीकेश पृथ्वीवर अवतरले आणि त्यांनी नानाचरित्रविलासाचा दिवसेंदिवस विस्तार करायला सुरुवात केली. त्यातही त्यांचे लहानपणीचे बाळचरित्र मधुर, सुंदर आणि अतिपवित्र आहे. युवावस्थेत त्यांनी जरासंधाचा पराभव होईल अशी व्यवस्था केली.

नंतर कालयवनाचे निर्दलन केले तो प्रसंग तर अतिविचित्र आहे. असे लाघव केवळ श्रीकृष्णच दाखवू शकतो. कालयवनाच्या पराभवाचा प्रसंग अतिविचित्र आहे कारण कालयवनाला तू कोणत्याही शस्त्राने मरणार नाहीस असा वर शिवाने दिला असल्याने तो अत्यंत उन्मत्त झाला होता.  कृष्णाने त्याच्यावर शस्त्र न चालवता, त्याला झुलवत झुलवत युद्धभूमीपासून दूर नेले आणि राजा मुचकुंद चिरनिद्रा घेत असलेल्या गुहेपाशी आणले. गुहेत शिरून श्रीकृष्ण मुचकुंदराजाच्या मागे जाऊन लपला. रागाने लाल झालेल्या कालयवनाने गुहेत प्रवेश केला परंतु अंधारामुळे त्याने मुचकुंदाला ओळखले नाही. त्याला वाटले की, श्रीकृष्णच तेथे झोपला आहे म्हणून त्याने मुचकुंदाला लाथ मारली. त्या लत्ताप्रहराने मुचकुंद जागा झाला आणि त्याने डोळे उघडून काल यवनाकडे रागाने पाहिल्याबरोबर काल यवन जळून भस्म झाला कारण मुचकुंदला दीर्घ निद्रेतून जो जागे करेल त्याच्याकडे त्याने पाहिले तर तो जळून भस्म होईल असा वर मिळालेला होता. अशाप्रकारे श्रीकृष्णाने युक्तीने कालयवनाचा वध केला.

क्रमश:

Advertisement
Tags :

.