For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दारूकाची शोचनीय अवस्था श्रीकृष्णांना बघवेना झाली

06:30 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
दारूकाची शोचनीय अवस्था श्रीकृष्णांना बघवेना झाली
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

समुद्राच्या तीरावर श्रीकृष्णांचा सारथी दारूक त्यांची वाट पहात उभा होता. बराचवेळ झाला तरी श्रीकृष्णनाथ आले नाहीत म्हणून तो त्यांच्या शोधार्थ निघाला. श्रीकृष्णाच्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत असतानाच त्याला भगवंताच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळांचा सुवास जाणवू लागला. त्या गंधाच्या वासाच्या अनुरोधाने तो त्यांच्या शोधार्थ पुढेपुढे जाऊ लागला. आणखीन थोडे पुढे गेल्यावर त्याने महातेजाचा प्रकाश बघितला. तसेच पुढे गेल्यावर धगधगीत तेजाचा गोळा असलेले, अश्वत्थाच्या झाडाखाली वीरासन घालून बसलेले घनसावळे श्रीकृष्णनाथ दारूकाच्या दृष्टीस पडले. श्रीकृष्णावरील आत्यंतिक प्रेमापोटी त्याने धावत जाऊन श्रीकृष्णाचे चरण पकडले. तेव्हढ्यात त्याच्या नजरेसमोरच एक चमत्कार घडला. देवांचा रथ सारथ्याशिवायच आकाशात उडाला. ते पाहून चकित झालेला दारूक मनात म्हणाला, मी आत्तापर्यंत श्रीकृष्णाचा सारथी म्हणून काम केले. त्यांचा रथ मीच नेहमी चालवत असे. आता मात्र श्रीकृष्णांनी स्वत:च रथाला ऊर्ध्वगतीने निजधामाला पाठवून दिले आणि मला येथेच ठेवले. ज्याने भगवंताच्या तळपायाला बाण मारला त्या जराव्याधाचाही देवांनी उद्धार केला. खरोखरच मी पूर्ण अभागी आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने माझा त्याग केला. तसं बघितलं तर माझ्या दृष्टीपुढे श्रीकृष्ण नित्य असायचे आणि त्यांच्या रथाचे लगाम हातात घेऊन मी त्यांचा रथ चालवायचो. असा क्रम कित्येक वर्षे चालू होता पण आता शेवटी श्रीकृष्णाने माझा अव्हेर करून वेगळे केले. किती मी दुर्दैवी असेन! मी श्रीकृष्णाचा सारथी आहे अशी माझी सगळीकडे ओळख आहे. मला त्रैलोक्यात जी काही ख्याती मिळाली आहे ती श्रीकृष्णामुळे मिळाली पण हाय हाय रे दुर्दैवा शेवटी श्रीकृष्णाने मला परके केले. असा कसा श्रीकृष्ण माझ्यावर रुसला काही कळायला मार्ग नाही. आयुष्यभर मी श्रीकृष्णाच्या सहवासाचे सुख उपभोगले आणि शेवटी माझ्यावर त्याच्या वियोगाचे दु:ख ओढवले. श्रीकृष्णा असे मला विन्मुख का झालात? मी तर तुमचा दीन आणि रंक सेवक आहे. तेव्हा माझ्यावर असे नाराज होऊ नका. मी अशी विनवणी करतोय कारण आयुष्यभर मी जे जे सांगितले त्यातल्या कणभराचाही तुम्ही कधी अव्हेर केला नाहीत. मग आता निर्याणाच्यावेळी असा दुर्धर दुरावा का? ज्याने तुमचा अपराध केला त्या जराव्याधालासुद्धा तुम्ही जवळ केलेत आणि त्याचा उद्धार केलात. मग माझा उद्धार तुम्ही का करत नाही? तुम्हाला माझा एव्हढा उबग कशामुळे आलेला आहे? दारुकाची अवस्था अत्यंत शोचनीय झाली होती. त्यातच श्रीकृष्णाचे मुख पहात असतानाच त्याला भडभडून रडू आले. तो तोंड खाली करून रडत असल्याने त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो मोठमोठ्याने हाका मारून श्रीकृष्णाची मनधरणी करू लागला. दु:खाने चरफडू लागला. कपाळ बडवून घेऊ लागला. नशिबाला बोल लावू लागला. भविष्यात काय लिहिले आहे हेच त्याच्या लक्षात येईना. श्रीकृष्णाची पुन:पुन्हा विनवणी करू लागला. म्हणाला, श्रीकृष्णनाथा तुमच्यापुढे विधातासुद्धा बापुडा होतो. तुमच्यापासून मला वेगळे करून तुम्ही निजधामाला निघून गेलात तर अत्यंत दीनपणे मला रहावे लागेल. दारूकाची शोचनीय अवस्था श्रीकृष्णांना बघवेना झाली. त्यांच्या वियोगामुळे दारूकाच्या मनाची होणारी घालमेल त्यांच्या लक्षात आली. ते त्याला कळवळून, अरे भिऊ नकोस, भिऊ नकोस असे म्हणू लागले. असे म्हणत असतानाच त्याला पूर्ण आश्वस्त करून दिलासा देत म्हणाले, आता माझ्या मनातली गुह्य गोष्ट तुला सांगतो. आत्ताच्या घडीला माझ्या अत्यंत जवळचा असा तू एकटाच राहिला आहेस. तुला माझे एक अत्यंत फार महत्त्वाचे काम करायचे आहे त्यासाठी मी तुला मागे ठेवले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.