श्री देव खाप्रेश्वर मंदिर सीमेच्या आतच बांधणार
मुख्यमंत्र्यांचे सुकूर ग्रामस्थांना आश्वासन
पणजी : श्री देव खाप्रेश्वराचे मंदिर गावातील सीमेच्या आत बांधण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुकूर गावच्या ग्रामस्थ, पंचायत सदस्यांना दिले आहे. यावेळी स्थानिक आमदार व पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे उपस्थित होते. खंवटे यांनी ग्रामस्थ पंचसदस्यांसह डॉ. सावंत यांची आल्तिनो पणजी येथे सहकारी निवासस्थानी भेट घेतली आणि चर्चा केली. त्यानंतर बाहेर आल्यावर खंवटे यांनी प्रसारमाध्यमांना वरील माहिती दिली. ते म्हणाले की, खाप्रेश्वर देवस्थान सीमेबाहेर न नेता ते आतमध्ये स्थापन करण्याचा शब्द डॉ. सावंत यांनी दिला आहे. त्यासाठी योग्य ती जागा ग्रामस्थांनी शोधावी आणि दाखवावी. गरज पडल्यास त्यासाठी प्रसाद घ्यावेत, अशी सूचना खंवटे यांनी केली. खाप्रेश्वर देवस्थान हटवताना ज्यांच्यावर तक्रारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते मागे घेण्यात येतील तसेच त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही असेही डॉ.सावंत यांनी स्पष्ट केल्याचे खंवटे यांनी नमूद केले. शिवाय देवस्थानाकडे पुन्हा एकदा वडाचे झाड लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले त्यामुळे ग्रामस्थांना गावातच सीमेच्या आतमध्ये खाप्रेश्वराचे मंदिर उपलब्ध होणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण आणखी ताणू नका आणि त्याचे राजकारण कऊ नका. जेवढे झाले तेवढे पुरे असे सांगून खंवटे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.