श्री देव धूतपापेश्वर, नवलादेवीची होळी आज राजापूर बाजारपेठेत
राजापूर :
राजापूर तालुक्याचे आराध्यदैवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर व नवलादेवी देवतांच्या होळ्या बुधवार 12 रोजी राजापूर शहरातून वाजत-गाजत धोपेश्वर मुक्कामी नेण्यात येणार आहेत. पाच वर्षांनी या दोन्ही देवतांच्या होळ्या शहरात येत असतात. त्यामुळे सर्वांना त्याची उत्सुकता लागून राहिलेली असते.
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये शिमगोत्सवाची सुरूवात होळीने करण्यात येते. आंब्याची, फोपळीची होळी सजवून ती नाचवत गावात आणली जाते व त्यानंतरच शिमगोत्सवाला सुरूवात होते. राजापुरातील प्रसिध्द श्री देव धूतपापेश्वरची होळी दर 5 वर्षांनी शहरामध्ये आणली जाते. सलग 2 वर्ष शहरातून मिरवणूक काढल्यानंतर पुन्हा पाच वर्ष ही होळी गावातच नाचवण्याची प्रथा आहे. त्यानुसार गतवर्षी होळी शहरामध्ये नाचवण्यात आली होती. आता यावर्षी पुन्हा शहरात होळी नाचल्यानंतर पुढील 5 वर्षे गावातच होळी नाचवण्यात येणार आहे. दरम्यान बुधवारी दुपारी शहर बाजारपेठेतून होळीची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. बाजारपेठेतून पारंपरिक मार्गाने होळी धोपेश्वर मुक्कामी नेण्यात येणार आहे. 5 वर्षांनी राजापूर शहर बाजारपेठेत येणाऱ्या दोन्ही देवतांच्या होळ्या नाचवण्यासाठी तरूणांची मोठी गर्दी होत असते. तर हा सोहळा पाहण्यासाठी भाविकही मोठ्या संख्येने शहरात येत असतात. त्यामुळे दुपारनंतर जवाहर चौक येथील एसटी वाहतूकही काही वेळासाठी बंद ठेवण्यात येणार असून राजापूर पोलिसांकडूनही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.