For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून श्री दामोदर भजनी सप्ताह

12:41 PM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजपासून श्री दामोदर भजनी सप्ताह
Advertisement

चोविस तास चालणार साखळी भजन : सायंकाळपासून निघणार आकर्षक पार,अनेक समाजांतर्फे नामवंतांच्या मैफिली,मुरगाव हिंदू समाजातर्फे महाप्रसाद सेवा 

Advertisement

वास्को : वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सवाला आज बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. वर्षपद्धतीप्रमाणे दुपारी 12.30 वा. जोशी कुटुंबीयांतर्फे श्री दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून 24 तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला विधिवत प्रारंभ होईल. गुरुवारी दुपारी गोपाळ काल्याने या उत्सवाची उत्साहात सांगता होईल. दुपारी भजनी सप्ताहाला प्रारंभ झाल्यानंतर सायंकाळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दिंडीसह विविध समाजाचे पार दामोदर मंदिराकडे मार्गस्थ होतील. पहाटेपर्यंत हे पार मंदिराकडे येऊन श्रीचरणी श्रीफळ अर्पण करतील.

मुरगांव पत्तन न्यास फैलवाले कामगार संघ, नाभिक समाज, दैवज्ञ ब्राह्मण समाज, बाजारकर समिती, विश्वकर्मा ब्राह्मण समाज व गाडेकर समाज यांच्यातर्फे ही परंपरा पाळली जात असून या समाजांतर्फे शहरात ठिकठिकाणी पहाटेपर्यंत संगीत मैफलींच्या बैठका रंगतील. या समाजांनी प्रसिद्ध गायक व वादक कलाकारांना आमंत्रीत केले आहे. मुरगाव पत्तन न्यास फैलवाले कामगार संघातर्फे गायक अर्णव बुवा (कोल्हापूर) व गायिका अंसिका नाईक (गोवा) यांची मैफल सायंकाळी 6.30 ते 9.30 वाजेपर्यंत वास्को टॅक्सी स्टॅण्डजवळ आयोजित करण्यात आली आहे. त्यांना हार्मोनियमवर चांगदेव नाईक, तबल्यावर शेखर मांद्रेकर, पखवाजवर स्वप्नील भोमकर तर ताळ साथ यश पालव करतील.

Advertisement

नाभिक समाजातर्फे गायक नितेश सावंत व गायिका स्वराली जोशी यांची संगीत मैफल सायंकाळी 6.30 ते  ते 9.30 वाजेपर्यंत नटराज थिएटरजवळ आयोजित करण्यात आली आहे. त्यांना हार्मोनियमवर दत्तराज म्हाळशी, तबल्यावर अमेय पटवर्धन व पखवाजवर शुभम सावंत तर मंजिरी साथ शुभम नाईक करतील. निवेदनाची जबाबदारी नेहा उपाध्ये सांभाळतील. दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे योगिता रायकर यांची संगीत मैफल रात्रौ 10 ते 1 वाजेपर्यंत वास्को टॅक्सी स्टॅण्डजवळ आयोजित करण्यात आली आहे. त्यांना हार्मोनियमवर प्रसाद गांवस तर तबल्यावर प्रसन्न साळकर व पखवाजवर विशांत सुर्लकर तर मंजिरी साथ यश पालव करतील. बाजारकर समितीतर्फे गायिका आरती अंकलीकर टिकेकर व गायक राजयोग धुरी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची भजनाची बैठक रात्री 9.30 वा. नटराज थिएटरजवळ होणार असून त्यांना हार्मोनियमवर दत्तराज सुर्लकर, तबल्यावर संकेत खलप, पखवाजवर किशोर तेली तर मंजीरीवर राहुल खांडोळकर साथसंगत करतील.

गायक राजयोग धुरी यांची भजनाची बैठक रात्री 11.30 वा. नटराज थिएटरजवळ आयोजित करण्यात आली असून त्यांना हार्मोनियमवर प्रविण बांदकर, हार्मोनियमवर दत्तराज सुर्लकर, तबल्यावर संकेत खलप, पखवाजवर किशोर तेली तर मंजिरी साथ राहुल खांडोळकर करतील. निवेदनाची जबाबदारी मानसी वाळवे सांभाळतील. श्री राम विश्वकर्मा ब्राह्मण समाजातर्फे गायक शुभम नाईक, दत्तू गावस, लवू गावस व गितेश हिंफाळकर यांची भजनाची बैठक मुरगाव पालिकेसमोर सायंकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. गाडेकर समाजातर्फे गायक प्रसन्ना प्रभू तेंडुलकर व गायिका भाग्यश्री आठल्ये यांची बैठक रात्रौ 10 ते 1 वाजेपर्यंत मुरगाव पालिका इमारतीतील मंडपामध्ये आयोजित करण्यात आली असून त्यांना हार्मोनियमवर समीर परब, तबल्यावर मिलिंद परब साथसंगत करतील. निवेदनाची जबाबदारी मृगणा सावईकर सांभाळतील.

चोवीस तास चालणार साखळी भजन

दुपारी दोन वाजल्यापासून श्री दामोदर मंदिरामध्ये अखंड 24 तास साखळी पद्धतीने स्थानिक भजनी पथकांची भजने होतील. त्यात बेलाबाय भजनी मंडळ, त्रिमूर्ती भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, कलादीप भजनी मंडळ (महिला),  लक्ष्मी नारायण भजनी मंडळ, त्रिशूल खाप्रेश्वर भजनी मंडळ, मुशेले कला मंडळ, शिवप्रासादिक भजनी मंडळ, साईबाबा भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ, ॐकार भजनी मंडळ, संतोषी माता भजनी मंडळ, स्वरब्रह्म भजनी मंडळ, शनैश्वर भजनी मंडळ, शिवसमर्थ भजनी मंडळ, राष्ट्रोळी भजनी मंडळ, ओरूले दत्तवाडी भजनी मंडळ, मनोहर मांद्रेकर भजनी मंडळ, राजाराम भजनी मंडळ, ॐ विष्णू भजनी मंडळ कला सांस्कृतिक संस्था, शारदा संगीत विद्यालय, गणपती पंचायतन भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ आदी भाग घेणार आहे. वरील भजने साई आर्ट्स, अॅड. राजन नाईक, हिरा केतन ठक्कर, उमेश साळगांवकर, अनिल सातार्डेकर, राजेंद्र डिचोलकर, अॅङ ज्ञानेश्वरी अशोक नाईक, भोसले काफेतारिया, राजेश शेट्यो, परेश प्रभाकर शेट तानावडे, विष्णू गारोडी, शैलेंद्र गोवेकर, श्री कामाक्षी ऑफसेट प्रिंटर, संतोष खोर्जुवेकर भरत कोलगावकर व अशोक मांद्रेकर यांनी पुरस्कृत केली आहेत.

गुरुवारी गोपाळकाल्याने होणार सांगता

सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सर्व पार व दिंड्यांचे दामोदराच्या सालाकडे आगमन होईल. त्यानंतर सकाळी उशिरा श्रीफळ विसर्जनासाठी टाळ मृदंगाच्या गजरात बाल गोपाळ समुद्राकडे निघतील. श्रीफळ विसर्जन करून झाल्यानंतर सर्व बाल गोपाळ मंदिरात दाखल झाल्याबरोबर गोपाळ काला, आरत्या, तीर्थप्रसाद होऊन 24 तासांच्या श्री दामोदर भजनी सप्ताहाची सांगता होईल. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे मुरगांव हिंदू समाजातर्फे यंदाही अन्नप्रसाद सेवा विद्याधिराज भवनच्या मागे दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.