For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीभागवत हे महाक्षेत्र असून ब्रह्मा हा मुख्य बीजधर आहे

06:55 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीभागवत हे महाक्षेत्र असून  ब्रह्मा हा मुख्य बीजधर आहे
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

एकादश स्कंधात श्रीकृष्णांनी परम प्राप्ती होण्यासाठी ज्ञान-वैराग्य-भक्ती-मुक्ती ह्याबद्दल स्वत: विवेचन केलेले आहे. ह्या ग्रंथाची अवतरणिका म्हणजे गोषवारा नाथमहाराज देत आहेत. एकूण एकतीस अध्याय आहेत, त्यापैकी पहिल्या अठ्ठावीस अध्यायात भगवंतांनी काय काय सांगितले आहे ते आपण बघितले. आता पुढील अध्यायांचा गोषवारा आपण पाहू. एकोणतिसाव्या अध्यायाचे निरुपण फार महत्त्वाचे आहे. ह्या अध्यायामध्ये काय सांगितले आहे ते जो नीट समजून घेईल आणि त्याप्रमाणे वर्तन करेल त्याला संपूर्ण भागवतात जे जे सांगितलं आहे ते ते सर्व हाती आल्यासारखे वाटेल. ह्या अध्यायामध्ये माणसाने जीवनात काय साधायला हवे, त्यासाठी साधना कोणती करावी, त्यातून ईश्वराप्रती एकात्मभाव कसा जोडावा ह्याबद्दल सविस्तर विवरण केलेले आहे. त्याप्रमाणे साधना करत गेल्यास ईश्वराशी एकरूपता साधली जाते. त्यापूर्वी अहंभावाचे पूर्णपणे निर्द्लन होते. मी म्हणजे हा देह ह्या गोष्टीची विस्मृती होऊन मी आत्मस्वरूप आहे ही भावना दृढ होऊन परमानंदाची प्राप्ती होते. अशारितीने जीवनाची इतिकर्तव्यता साधली जाते. ह्या ठिकाणी श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश परिपूर्ण झाला. त्यामुळे श्रीकृष्ण निजधामाला जाण्यासाठी सिद्ध झाला. ज्याप्रमाणे यथेच्छ जेवण झाल्यावर त्यांची परिपूर्तता चंदन आणि विडा देऊन साधली जाते. त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे अवतारकार्य आता परिपूर्ण झाले असल्याने तीस आणि एकतिसाव्या अध्यायात श्रीकृष्णाच्या निजधामाला जाण्याच्या प्रसंगाचे साद्यंत वर्णन आलेले आहे. ज्याचे पोट पूर्ण भरलेले असते त्याला जेवताना वाढलेल्या कोणत्याही पदार्थाची गोडी रहात नाही. त्याप्रमाणे ब्रह्मरसाची गोडी पूर्णपणे जाणून असलेल्या श्रीकृष्णाला स्वत:च्या यादव कुळाची ममता खुणावत नव्हती. त्यांच्या मस्तवालपणाचे पुरेपूर माप त्यांच्या पदरात टाकण्याच्या उद्देशाने त्याने स्वत:च्याच कुलाचा नायनाट केला आणि मग तो निश्चिंत मनाने निजधामाला गेला. ज्याला पूर्ण ब्रह्मानुभव प्राप्त असतो त्याला ह्या लोकीच्या कोणत्याही गोष्टीत काडीचाही रस नसतो हे स्वत:च्या वागण्यातून हृशिकेशाने प्रत्यक्ष दाखवून दिले आणि मगच तो निजधामाला गेला. श्रीमदभागवतपुराणाचा जन्म कसा झाला ते आता नाथमहाराज सांगत आहेत. ते म्हणाले, श्रीभागवत हे महाक्षेत्र असून ब्रह्मा हा मुख्य बीजधर आहे. येथे नारदाचे प्रभुत्व आहे. सुरवातीला त्याने विचित्र अशी पेरणी केली. ते बघून श्रीव्यासानी त्या पेरणीला अनुसरून सर्वत्र बंधारे घातले. त्यामुळे कल्पनेच्या पलीकडे बेसुमार पिक आले. त्यातून स्वानंदबोधाची कणसे हाती आली. त्यावर सोपस्कार करायला शुकमुनी तयार झाले. त्यावर संस्कार करून त्यांनी त्यातील भूस बाजूला काढून हरीकथेची जुळवाजुळव केली. त्यातल्या एकादश स्कंधामध्ये उद्धवाच्या विनंतीवरून भगवंतांनी त्याला त्यातले दाणे काढून भरवले. अनेक युक्त्याप्रयुक्त्या करून, उद्धवाच्या निरनिराळ्या प्रश्नांना उत्तरे देऊन, तसेच जेथे उद्धवाने प्रश्न विचारले नाहीत पण अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज भगवंतांना वाटली तेथे त्यांनी त्या त्या मुद्याचे विशेष विवेचन केले आणि त्यामुळे त्यांचे सांगणे अधिकाधिक रोचक झाले. उद्धवाला तर ते अतिशय पसंत पडले. त्याचा भ्रमनिरास झाला. जरी भगवंत निजधामाला गेले तरी ते सदैव आपल्याबरोबरही राहणार आहेत अशी त्याची खात्री पटली आणि तो निश्चिंत आणि निर्भय झाला. भगवंतांनी उद्धवाला केलेला उपदेश सविस्तर, सोप्या भाषेत असल्यामुळे उद्धवाबरोबरच समस्त लोकांच्यावरही देवांचे अनंत उपकार झाले. त्यामुळे उद्धवाच्यामागे जे लोक पंक्तीला बसले त्यांनाही भगवंतांनी उद्धवाला वाढलेल्या पक्वान्नाच्या ताटाचा लाभ झाला.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.