श्रेयस, सिराजचे कमबॅक, शमीकडे पुन्हा कानाडोळा
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा : कॅप्टन शुभमन, नितीश कुमार रेड्डीही खेळणार
वृत्तसंस्था/ मुंबई
न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. हा भारतीय क्रिकेट संघाचा नवीन वर्षातील पहिला दौरा न्यूझीलंडविरुद्ध असेल. कॅप्टन शुभमनसोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांचे संघात कमबॅक झाले आहे. तथापि, श्रेयस तंदुरुस्त घोषित झाला तरच तो मालिकेत सहभागी होऊ शकेल. उभय संघातील पहिला सामना दि. 11 रोजी वडोदरा येथे खेळवला जाईल.
बीसीसीआय मुख्यालयात निवड समितीने शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध संघाची घोषणा केली. उभय संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. त्यानंतर पाच टी-20 सामने खेळणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेआधी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगितले होते. या स्पर्धेत खेळताना सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. यामुळे किवीजविरुद्ध मालिकेत खेळताना कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता होती.
शुभमन, श्रेयस, सिराज खेळणार
मानेला झालेल्या दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिल आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता. मात्र आता तो या दुखापतीतून सावरला आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. मात्र त्याचे खेळणे नॅशनल क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय चमूच्या परवानगीवर अवलंबून असेल. तसेच या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून मोहम्मद सिराज या मालिकेत खेळताना दिसणार आहे.
तिलक, ऋतुराजला वगळले
द.आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाडला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या दोघांनीही विजय हजारे ट्रॉफीत चमकदार कामगिरी केली होती, पण या दोघांना संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.
शमीकडे पुन्हा दुर्लक्ष, नितीश कुमार रेड्डीला स्थान
दरम्यान टीम इंडियाचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा एकदा निवड समितीने डच्चू दिला आहे. शमीला या मालिकेत संधी मिळेल, असे बोलले जात होते मात्र निवड समितीने शमीला पुन्हा एकदा डावलले आहे. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला मात्र या मालिकेसाठी निवड समितीने स्थान दिले आहे. हार्दिक पंड्या या मालिकेत खेळताना दिसणार नाही.
अनुभवी रोहित शर्मा, दिग्गज खेळाडू विराट कोहली आफ्रिकेविरुद्ध मालिकेनंतर पुन्हा एकदा मैदानात आपला जलवा दाखवताना दिसणार आहेत. याशिवाय, केएल राहुल, रविंद्र जडेजा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव हे स्टार खेळाडू किवीजविरुद्ध शानदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असतील.
भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि यशस्वी जैस्वाल.
भारत-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक
11 जानेवारी - पहिला वनडे सामना, वडोदरा
14 जानेवारी - दुसरा वनडे सामना, राजकोट
18 जानेवारी - तिसरा वनडे सामना, इंदूर
21 जानेवारी - पहिला टी 20, नागपूर
23 जानेवारी - दुसरा टी 20, रायपूर
25 जानेवारी - तिसरा टी 20, गुवाहाटी
28 जानेवारी - चौथा टी 20, विशाखापट्टणम
31 जानेवारी - पाचवा टी 20, तिरुवनंतपुरम.