आयसीसी पुरस्कारासाठी श्रेयसची शिफारस
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक महिनाअखेरीस सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड विविध स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेवून केली जाते. आता मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारासाठी भारताचा श्रेयस अय्यर, न्यूझीलंडचे रचिन रविंद्र आणि जेकॉब डफी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये श्रेयस अय्यरने पाच सामन्यात 48.60 धावांच्या सरासरीने दोन अर्धशतकांसह 243 धावा जमविल्या. भारतीय संघाला चॅम्पियन्स करंडक मिळवून देण्यामध्ये श्रेयस अय्यरची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. गेल्या मार्चमध्ये झालेल्या तीन वनडे सामन्यात अय्यरने 57.53 धावांच्या सरासरीने 172 धावा जमविल्या आहेत. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाबरोबरच्या उपांत्य सामन्यात अय्यरने महत्त्वाच्या 45 धावा तर न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 48 धावा जमविल्या होत्या.
न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने चॅम्पियन करंडक स्पर्धेत चार सामन्यांतून 65.75 धावांच्या सरासरीने दोन शतकांसह 263 धावा जमविल्या. तसेच मार्चमधील तीन वनडे सामन्यात त्याने 151 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याने तीन बळी मिळविले. न्यूझीलंडचा गोलंदाज जेकॉब डफीने पाकविरुद्धच्या टी-20 मालिकेत 6.17 धावांच्या सरासरीने 13 गडी बाद केले. तसेच वनडे मालिकेतही पाकविरुद्ध त्याची कामगिरी महत्त्वाची ठरली होती.