श्रेयस अय्यरच्या द्विशतकाने मुंबई भक्कम स्थितीत
रणजी करंडक : श्रेयसची टी-20 स्टाईल बॅटिंग : 228 चेंडूत 233 धावा : मुंबईचा 4 बाद 602 धावांचा डोंगर : ओडिशाचा पहिला डाव घसरला
वृत्तसंस्था/मुंबई
येथील शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीतील ओडिशाविरुद्ध लढतीत दुसरा दिवस स्टार फलंदाज श्रेयस अय्यर व सिद्धेश लाड यांनी गाजवला. मागील अनेक दिवसांपासून टीम इंडियात संधी न मिळालेल्या श्रेयसने दमदार फलंदाजी करून द्विशतक ठोकलं आहे. टी-20 स्टाईलने बॅटिंग करताना त्याने 228 चेंडूत 24 चौकार व 9 षटकारासह 233 धावा केल्या. श्रेयसचे द्विशतक व सिद्धेश लाडच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिला डाव 4 बाद 602 धावांवर घोषित केला. यानंतर ओडिशाच्या डावाची खराब सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवसअखेरीस त्यांनी 5 गडी गमावत 146 धावा केल्या होत्या.
मुंबईने 3 बाद 385 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. यानंतर श्रेयस व सिद्धेश यांनी ओडिशाच्या गोलंदाजांना तुफान झोडपले. मुंबईने दुपारच्या सत्रात आपला पहिला डाव 123.5 षटकांत 4 बाद 602 धावांवर घोषित केला. त्रिपुराविरुद्धच्या तिस्रया फेरीच्या सामन्यात श्रेयस अय्यर सहभागी झाला नव्हता. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो खेळू शकला नाही. मात्र, परत येताच त्याने शतक झळकावले आणि त्यानंतर द्विशतक झळकावले. श्रेयसने 201 चेंडूत 20 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने रणजी
ट्रॉफीतील तिसरे द्विशतक झळकावले. 9 वर्षांनंतर रणजीमधील त्याचे हे पहिलेच द्विशतक आहे. यापूर्वी त्याने 2015 मध्ये ही मोठी कामगिरी केली होती. त्याने 228 चेंडूत 233 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, श्रेयसची ही प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. 233 धावांवर त्याला राठोडने बाद केले. बाद होण्यापूर्वी त्याने सिद्धेश लाडसोबत चौथ्या विकेटसाठी 354 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
सिद्धेश लाडचे दीडशतक
श्रेयस बाद झाल्यानंतर सिद्धेश लाड व सूर्यांश शेडगे यांनी संघाला सहाशेपर्यंत मजल मारुन दिली. सिद्धेश 169 व शेडगे 79 धावांवर खेळत असताना मुंबईने डाव घोषित केला आणि ओडिसाला फलंदाजीला बोलवले. मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना दिवसअखेरीस ओडिशाच्या पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ओडिसाने 5 गडी गमावत 146 धावा केल्या होत्या. ओडिशाचा संघ अद्याप 456 धावांनी पिछाडीवर आहे. ओडिशाच्या तीन खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही.
सेनादलाविरुद्ध महाराष्ट्राचे सपशेल लोटांगण
पुणे : येथील गहुंजे स्टेडियमवर सेनादलाविरुद्ध सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीतील सामन्यात महाराष्ट्राचा संघ बॅकफूटवर गेला आहे. सेनादलाला पहिल्या डावात 239 धावांत रोखल्यानंतर महाराष्ट्राचा पहिला डाव अवघ्या 185 धावांत आटोपला. कर्णधार अंकित बावणेची अर्धशतकी खेळी वगळता इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. बावणेने सर्वाधिक 73 धावा केल्या. सेनादलाच्या अमित शुक्लाने सर्वाधिक 7 गडी बाद केले. यानंतर सेनादलाने दुसऱ्या डावात बिनबाद 15 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुभम रोहिला 9 तर वसिष्ठ 5 धावांवर खेळत होते. सेनादलाकडे आता 123 धावांची आघाडी आहे.
इतर रणजी सामन्यांचे निकाल
- पश्चिम बंगाल 301 वि कर्नाटक 5 बाद 155
- तमिळनाडू 338 वि आसाम 3 बाद 176
- बडोदा 235 वि त्रिपुरा 1 बाद 192
- छत्तीसगड 9 बाद 500 घोषित वि रेल्वे बिनबाद 75
- हिमाचल प्रदेश 307 वि विदर्भ 2 बाद 283
- गोवा 9 बाद 555 घोषित वि मिझोराम 6 बाद 122.
संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव 4 बाद 602 घोषित (रघुवंशी 92, सिद्धेश लाड नाबाद 169, श्रेयस अय्यर 233, सूर्यांश शेडगे नाबाद 79, बिप्लव समंत्रय दोन बळी). ओडिशा पहिला डाव 49 षटकांत 5 बाद 146 (सारंगी 39, संदीप पटनाईक नाबाद 73, प्रधान नाबाद 7, शम्स मुलाणी व हिमांशू सिंग प्रत्येकी दोन बळी).