For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रेया घोषाल यांच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली

09:12 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रेया घोषाल यांच्या गाण्यांवर तरुणाई थिरकली
Advertisement

प्रत्येक गाण्याला उत्स्फूर्त दाद : जीआयटी कॉलेज ‘ऑरा 2024’ कार्यक्रमाची सांगता

Advertisement

बेळगाव : प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या समुहासमोर आघाडीच्या गायिका श्रेया घोषाल यांनी आपल्या गाण्यांनी त्यांना थिरकायला लावले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रत्येक गाण्याला उत्स्फूर्त दाद देत जल्लोष करत त्यांचा उत्साह वाढविला. कर्नाटक लॉ सोसायटीच्या जीआयटी कॉलेजतर्फे सालाबादप्रमाणे ‘ऑरा-2024’ चे आयोजन 13 ते 15 मार्च दरम्यान करण्यात आले होते. त्याची सांगता शुक्रवारी श्रेया घोषाल यांच्या गायनाने झाली. श्रेया यांच्या गाण्याची आवड असणारी तरुणाई सायंकाळी 5 वाजल्यापासूनच कॉलेजकडे येऊ लागली. कडक सुरक्षा व्यवस्थेने प्रत्येकांचे ओळखपत्र आणि पास तपासूनच आत पाठविले. तरी आत जेवढी गर्दी होती, तेवढीच गर्दी बाहेरही तरुणाईने केली होती. श्रेया यांनी ‘नजर जो तेरी लागली, तुम क्या मिले, सिलसिला ये चाहत क्या, मोरे पिया, डोलारे डोला, ढोल बाजे ढोल, रघुवर तेरी राह, राफ्ता राफ्ता, रबने बना दी जोडी, पनघट पे मोरे सयाँ, कुछ तो है तुजसे, बदमाश दिल’ अशी एकापेक्षा एक सरस गीते बहारदारपणे सादर केली. त्यांनी त्यांच्या ‘पिंगा ग पोरी पिंगा व अप्सरा आली’ या गीताला तर तरुणाईने टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. त्यांनी ‘अरळूतीदे जीवद गेळेया, हुवीन बाडदंते’ या गीतांसह काही कानडी गीतेही सादर केली. त्यांच्यासमवेत किंजल चॅटर्जी यांनी गायक के. के. यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी एक गीत सादर केले. शिवाय ए. आर. रेहमान यांचेही गीत सादर केले. यानंतर पुन्हा रंगमंचावर येऊन श्रेया यांनी काही गीते सादर करून ‘आम्ही जे तोमार’ या गीताने सांगता केली. श्रेया घोषाल यांच्या वादकांच्या समूहामध्ये बेळगावच्या डेव्हिड या गिटार वादक तरुणाचा सहभाग आहे किंजल यांनी त्याची विशेष ओळख करून दिली.

श्रेया यांचा सत्कार

Advertisement

मध्यंतरामध्ये कॉलेजच्या कार्यकारी मंडळातर्फे श्रेया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘तुम्ही बोलावले तर मी बेळगावला यायला नेहमीच तयार असेन’, अशी ग्वाही श्रेया यांनी दिली.

Advertisement
Tags :

.