श्रावणीला एआयमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचेय
कोल्हापूर :
महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थीनी श्रावणी महेश माने हिने 97.60 टक्के गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक मिळवला. नियमित पुस्तकाचे वाचन करून स्वत:च्या नोटस काढल्या, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडील आणि आजीच्या सहकार्यामुळेच मी दहावीत ऐवढे यश मिळवू शकलो. तंत्रनिकेतनमधून कॉम्प्युटर सायन्सचा डिप्लोमा पूर्ण करणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी पदवीसाठी एआय विषय निवडत सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया तरूण भारतशी बोलताना श्रावणीने दिली.
श्रावणी शुक्रवारपेठेतील नागराज गल्ली येथे आई-वडील व आजीसोबत राहते. श्रावणीचे वडील एका सलून दुकानात काम करून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी सर्वोत्परी मदत करतात. श्रावणीने आई-वडीलांच्या कष्टाला न्याय द्यायचा या हेतूने शाळेच्या वेळे व्यतिरिक्त दररोज चार ते पाच तास अभ्यास केला. तिच्या अभ्यासातील सातत्यामुळेच तिला दहावीत 97.60 टक्के गुण मिळाले. दोन विषयासाठी खासगी शिकवणी लावली होती. परंतू इतर सर्व विषयाचा तिने सेल्फ स्टडी केला आहे. तिने आपल्या घरातील परिस्थितीचा कधीही अभ्यासावर परिणाम होवू दिला नाही. तिने मोठ्या स्वाभिमानाने अभ्यास करीत आपल्या वडीलांच्या कष्टाला यशाची फुले फुलवली. तिच्या या यशामुळे वडील महेश, आई पुष्पा आणि आजी मंदा यांचे हृदय भरून आले. त्यांनी श्रावणीला पेढे भरवत आपल्या मुलीचे कौतुक केले. श्रावणी दहावीनंतर तंत्रनिकेतनला प्रवेश घेवून कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा पूर्ण करणार आहे. त्यानंतर एआयमधून पदवीचे शिक्षण घेत सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ती तयारीही करीत असून दहावीच्या अभ्यासासह पुढील शिक्षणासाठी तिची आत्येबहिण देविका जाधव मार्गदर्शन करते, असे सांगणेही श्रावणी विसरली नाही. श्रावणीच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, आई-वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.