For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सणांची रेलचेल घेऊन आला श्रावणमास

04:14 PM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
सणांची रेलचेल घेऊन आला श्रावणमास
Advertisement

आध्यात्मिक चिंतन, नवीन प्रारंभ अन् धार्मिक एकतेचा काळ

Advertisement

पणजी : धार्मिक अनुष्ठान, व्रतवैकल्य करण्यासाठी महत्त्वाचा अन् सणांची रेलचेल असणारा नीज श्रावण महिना आजपासून सुरू होत आहे. श्रावण महिना अध्यात्मिक चिंतन, नवीन प्रारंभ आणि धार्मिक एकतेचा काळ आहे. या पवित्र महिन्यातील उत्सव गोव्यातील पारंपरिक भान आणि सांस्कृतिक परंपरांची उत्कंठा दर्शवतात. लोक त्यांच्या धार्मिक भावना आणि सांस्कृतिक परंपरांना जपत, श्रावण महिन्यातील सणांना उत्साहाने साजरा करताना दिसतात. श्रावणाचा नजारा सगळीकडे सारखा असतो. सृष्टी हिरवा शालू पांघरून नटलेली असते. कधी धुवांधार पाऊस तर कधी ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. धार्मिक सण उत्सवामुळे वातावरणात चैतन्य भरलेले असते. प्रचंड पाऊस पडणाऱ्या गोव्यातही श्रावणातल्या रंगांची उधळण असते. गोव्यात श्रावण महिना सर्वांना हवाहवासा वाटत असतो. सगळ्या सणांची धामधूम या महिन्यापासून सुरू होते. त्यात गोवेकर श्र्रद्धाळू, देवभक्त, व्रतवैकल्य करणारे. त्यामुळे गोव्यामध्ये खूप भक्तिभावाने श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. गोवा निसर्ग समृद्धीने नटलेला प्रदेश आहे. चोहोबाजूने हिरवीगार झाडे डोलत असतात. पाऊस पडून गेल्यानंतर झाडांची पाने हिरव्यागार पाचूसारखी चमकत असतात. राज्यात प्रत्येक गावातील देवळांमध्ये श्रावणात पूजा पाठ, भजने उत्साहाने सादर केली जातात.

भजन संध्या, कीर्तन, फुगड्या

Advertisement

याच महिन्यात भजन स्पर्धांचेही आयोजन केले जाते आणि भजनी मंडळे मोठ्या उत्साहाने त्यामध्ये सहभाग घेत असतात. अनेक ठिकाणी ‘भजन संध्या’ आणि ‘कीर्तन’ सत्रांचे आयोजन करण्यात केले जाते. ज्यात भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. महिला नटून थटून देवळांमध्ये फुगड्यांचा खेळ खेळण्यासाठी एकत्र येतात. गोव्यातील महिलांमध्ये फुगडी खूप प्रसिद्ध आहे.

पहिला सण नागपंचमी

श्रावण महिन्यातील सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. गोव्यात नागपंचमीच्या दिवशी बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पातोळे. हळदीच्या पानांमध्ये बनवलेल्या या पातोळ्यांचा घमघमाट प्रत्येक घराघरांतून येत असतो. तांदळाच्या पिठाची उकड काढून ती हळदीच्या पानावर पसरवून त्यात मोदकाचे सारण भरून त्या पानांची उकड काढली जाते. गोव्यात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. श्रावण महिन्यातील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी. गोव्यातील अनेक मंदिरे आणि पद्धतीनुसार गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. काही ठिकाणी ‘दही हंडी’ स्पर्धा देखील आयोजित केली जात आहे, ज्यात स्थानिक तऊण मोठ्या संख्येने सहभाग घेतात.

ब्राह्मणभोजन

श्रावणात अजून एका गोष्टीला खूप महत्त्व आहे, ते म्हणजे ब्राह्मणभोजन. या दिवशी भटजींना घरी बोलावून होमहवन केले जाते. देव्हाऱ्यातील नारळ वर्षातून एकदा याच दिवशी बदलला जातो. भटजी स्वत: स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात आणि प्रसाद म्हणून सर्वजण त्याचा लाभ घेतात. या दिवसात पूजेसाठी भटजी मिळणे खूप अवघड असते. असा हा श्रावण महिना गोव्यामध्ये खूप भक्तिभावाने आणि आनंदी वातावरणात साजरा केला जातो.

पूजेच्या साहित्याने सजले स्टॉल

दरम्यान, राज्यात श्रावण महिन्याच्या प्रारंभाने धार्मिक वातावरणात आणि सांस्कृतिक उत्सवात एक नवीन रंग भरला आहे. हा पवित्र महिना भगवान शिवाला समर्पित असून, हिंदू पंचांगानुसार विशेष धार्मिक महत्त्व राखतो. श्रावण महिन्याच्या आगमनाने गोव्यातील धार्मिक स्थळांवर आणि विविध सामुदायिक कार्यक्रमांमध्ये चैतन्याचे वारे पसरणार आहे. श्रावण महिन्यात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारात दाखल होतात. विशेषत: बेलपत्र, दूध, केळीची पाने, हळदीची पाने, दुर्वा, अशा साहित्याद्वारे विव्रेत्यांनी त्यांचे स्टॉल्स सजवले असून, विविध धार्मिक वस्तूंच्या विक्रीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

श्रावण ‘आयतार’चा बेत असतो खास..!

गोव्यामध्ये श्रावणी रविवारला अधिक महत्त्व आहे. यादिवशी सुवासिनी आदित्य पूजन करतात. त्याला आयतार पूजन असेही म्हटले जाते. पाटावर सूर्याचे चित्र काढले जाते. वेगवेगळ्या झाडांची पाने गोळा करून त्याची पूजा केली जाते. त्याला गोव्यात पत्री असे म्हणले जाते. सामान्य जीवनात ज्या पानांचा वापर होत नाही. अशा दुर्मीळ पानांचा वापर ‘पत्री’ म्हणून केला जातो. श्रावण मासातील दर रविवाराला विशिष्ट पदार्थ केले जातात. त्यात पहिल्या रविवारला मुठली, दुसऱ्या रविवारला पातोळे, तिसऱ्या रविवारला आटवल तर शेवटच्या रविवारला पोळे केले जातात. अशा या गोडधोड पदार्थांची रेलचेल असलेल्या या पदार्थांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून, ते सुख-समृद्धी आणण्याचे प्रतीक मानले जाते.

Advertisement
Tags :

.