महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रावण आला गं वनी श्रावण आला

06:06 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दरवळे गंध मधुर ओला

Advertisement

एकलीच मी उभी अंगणी

Advertisement

उगिच कुणाला आणित स्मरणी

चार दिशांनी जमल्या तोवर

गगनी घनमाला

आशाताईंच्या आवाजातला श्रावण. धो धो धो धो पाऊस पडायचा काळ थोडा थांबलेला. पाणी पिऊन पिऊन धरती आता तृप्त झालेली असते. भुईतील वर आलेली पिकं वाऱ्यावर डोलत असतात. बोरकर म्हणतात तसा सृष्टीला पाचवा महिना लागलेला असतो. ती कशी नितळ सुरेख सौभाग्यवती सारखी भासत असते. नववधूसारखी आता आभाळ जडशीळ काळंजांभळं होत नाही भरून तर आलेलं असतं पण पाऊस पडतो मात्र सोसा सोसाने. थोडा थोडा. थांबून थांबून. असं म्हणतात, आश्लेषा नक्षत्राचा जो पाऊस असतो तो ‘मी येतो सळासळा तुम्ही पुढे पळा पळा’ असं म्हणतो. अगदी तसाच जोर झपाट्याने झम्माट्याने येणारा पाऊस हा. आला आला म्हणेपर्यंत पळून निघून जाणारा! ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ, मध्येच असणारे इंद्रधनुष्य, सारं काही चित्तवेधक. श्रावण सणांचा राजा, श्रावण ऋतूंचा लाडका!

हसरा नाचरा जरासा लाजरा

सुंदर साजरा श्रावण आला

ऐकल्याशिवाय कळणार नाही, की हे गाणं पद्मश्री पद्मजा फेणाणी यांच्या कंठी किती शोभून दिसलं ते! कारण त्या श्रावणाच्या जशा रंगछटा असतात ना तितक्याच छटा त्यांच्या स्वराला प्राप्त आहेत. ऐकता ऐकता संपतच नाहीत. आपल्याला सर्वांना माहितच आहे की पावसाळ्याच्या दिवसात कास पठारावर अक्षरश: लाखो प्रकारची विविधरंगी, विविध गंधांची, विविध आकाराची आणि प्रत्येकाचं वेगळं सौंदर्य असलेली अशी फुलं फुलत असतात. तो एक महोत्सवच असतो. आणि त्याची सुरुवातच मुळी होते या श्रावण काळात, म्हणजेच पावसाळ्यात. हा उत्सव साजरा करायला खूप पर्यटक लोटत असतात. तेंव्हा खरंच कळतच नसेल की कोण नक्की कोणाला बघायला आले. छोटी छोटी विविधरंगी विविध गंधांची फुलं म्हणजे नाजूक हसरी निरागस मुलंच जणू. असं वाटतं की तीच माना डोलावून डोलावून वेळावून पर्यटकांकडे बघतात की काय? या फुलांकडे पाहिलं ना, त्यांचे रंग त्यांच्या छटा त्यांचे सुंदर सुंदर आकार हे सगळं पाहिलं ना, की मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं अतिशय

प्रसिद्ध असलेले गीत आठवतं.

श्रावणात घन निळा बरसला

रिमझिम रेशीम धारा

उलगडला झाडातून अवचित

हिरवा मोर पिसारा.

एखाद्या शालीन, घरंदाज, तृप्त आणि आबदार भारदस्त गृहिणीप्रमाणे भासणारी सृष्टी तनामनावर चढून राहिलेल्या सुखाच्या सायीची मऊशार शाल वागवत स्मितहास्य करत असते जणू.उत्तर भारतीयांची मासगणना पद्धत ही आपल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळी असते. तिथे पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत असा एक चांद्रमास धरतात. आणि खरंतर तिथे पाऊसही उशिरा पोहोचतो. आपल्याकडे ज्येष्ठ आषाढ पावसाची झोड उठलेली असते. पण तिकडचा पावसाळा श्रावण महिन्याशिवाय सुरू होत नाही. पण तो श्रावण महिना लागण्याचा काळ कसा मोजला जातो माहित आहे? आषाढाच्या पौर्णिमेपासून ते श्रावण महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत असा होतो तो श्रावण महिना. म्हणूनच की काय उत्तरेत जन्माला येऊन उत्तरेतच भरपूर विकसित झालेल्या शास्त्राrय संगीतामध्ये सावनच्या महिन्याशिवाय बंदिश पूर्णच होत नाही. अगदी ठुमरी असो, छोटा ख्याल असो, गझल असो सावनचा उल्लेख तुम्हाला सर्वत्र आढळतो. ‘सावन आया तुम नही आये’ ह्या व्यथेने भरलेल्या दुखऱ्या मनाचा सल दाखवणाऱ्या कित्येक बंदिशी श्रावणाची हीसुद्धा छटा दाखवतात. उत्तर भारतीय श्रावण महिन्याची सुरुवातीची झलक दाखवणारी एक दमदार बंदिश म्हणजे

‘सावन की बुंदनिया बरसत घनघोर’

राग केदारातली ही बंदिश गायली आहे पंडित भीमसेन जोशी यांनी. अर्थातच त्यांच्या गायकीप्रमाणेच ही चीजही मोठी दमदार आणि जोशपूर्ण आहे. ‘सावन की बुंदनिया’ या चीजेची पहिली ओळ इतक्या कमाल नक्षीकामाने इतक्या स्वरवैविध्यासहित पेश झाली आहे की एक स्वर रचना दुसऱ्यांदा ऐकायला मिळणार नाही इतकं कमाल वैविध्य! खरोखरीच पावसाच्या प्रत्येक थेंबातलं वैविध्य त्यात नक्कीच उतरलेलं असावं. ऐकणारा प्रेक्षक खरोखरच त्या श्रावणाच्या सुरुवातीच्या दमदार पावसात न्हाहून निघतो. असं म्हणतात की पंडित भीमसेन जोशींच्या मैफिलीमध्ये त्यांनी अशा प्रकारच्या चिजा गायल्यानंतर खरोखरीचा पाऊसही येत असे. आणि मग ऐकणाऱ्यांची आणि साथीदारांची आयोजकांची अशी सर्वांची त्रेधातिरपीट उडत असे. त्यांच्या गाण्याला श्रावणाने दिलेली ही दाद तर नसेल? असेलही. कारण निसर्ग इतका सर्वश्रेष्ठ कलाकार आजवर कधी झालाय का?

विश्व नाट्या सूत्रधार तूच शामसुंदरा

चातुरी तुझी अगाध कमलनयन श्रीधरा

असा तो जगन्नियंता सर्वश्रेष्ठ कलाकार असणारच. मग तो दुसऱ्या कलाकाराला मनापासून दाद देणार नाही का?

हलक्या हलक्या होत जाणाऱ्या पावलांनी डोंगरातून खाली खाली उतरत खेड्यावर पसरणारा श्रावण मोठा लोभस असतो. ओढे, वहाळ भरलेले असतात. नदीचं पात्र संथावलेलं असतं. काठावर दोन्ही बाजूंना हिरवीगार वनराई डोलत असते. झाडं पाण्यात आपली प्रतिबिंब बघत असतात. अधून मधून पक्षी पाण्याच्या प्रवाहावरून सूर मारत असतात. फुलांप्रमाणेच या काळात वेगवेगळ्या रंगाचे जातीचे देखणे पक्षीही बरेच बघायला मिळतात. आणि हो, खेड्यातल्या श्रावणात शेतीची कामं जराशी थार घेतात तेव्हा लगेच मंदिरं गजबजतात.

उदाधुपाचा, ताज्या फुलांचा, चंदन गंधाचा एकच दरवळ गाभाऱ्यात कोंदलेला असतो. वेदपठणाचे, आरत्यांचे, मंत्रघोषाचे, देवस्तुतीचे स्वर कानावर अखंड निनादत असतात. दर श्रावण सोमवारी शिवाची आराधना, मंगळवारी नववधूंच्या कौतुकाने नटलेल्या मंगळागौरीची झुंबड, आणि शनिवारची कहाणी तर आपल्याला सांगते ती दारी उभ्या राहिलेल्या अतिथीची कशी सेवा करावी ते. श्रावणात सण कुळाचार खूप येतात. रोज देवाला तुपाचा दिवा असतो. लहान मुलांच्या अखंड आयुष्यासाठी जिवतीची आराधना असते. आणि रोज पानावर काही ना काही गोड असतं. मनाला थोडे नियम असतात. तनाला थोडासा विसावाही असतो आणि डोळ्याचा शिणवटा श्रावणाची हिरवाई बघून मिटलेला असतो. आणि रोजच्या जगण्याची विवंचना एकदा का मिटत आल्याचं टप्प्यात आलं की मग माजघरातल्या झोपाळ्यांपासून शिवारातल्या शेतघरापर्यंत सगळीकडे वावरणाऱ्या कष्टकरी माणसाच्या कंठी सूर येतात. आपले बा भ बोरकर अशाच माणसांमध्ये वावरले. म्हणून त्यांच्या कवितेत श्रावणही असतो आणि गाणंही.

श्रावण लावण्यराज लागला फुलाया.

 - अॅड.अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article