For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shravan Gappa: आठवणींच्या कुपीतील सुगंधीत श्रावण, वैशाली क्षीरसागर यांची खास मुलाखत

11:43 AM Aug 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
shravan gappa  आठवणींच्या कुपीतील सुगंधीत श्रावण  वैशाली क्षीरसागर यांची खास मुलाखत
Advertisement

कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेत तर याचा सोहळाच असतो

Advertisement

By : साजिद पिरजादे, दिव्या कांबळे

कोल्हापूर : श्रावण महिना म्हणजे सण, संस्कृती, आनंदाचा काळ. श्रावणात प्रत्येक दिवशी उत्साहाचं वातावरण असतं. कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेत तर याचा सोहळाच असतो. अशा या मंगलमय वातावरणात आम्ही भेटलो राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, . राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी, वैशाली क्षीरसागर यांना.

Advertisement

राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणाऱ्या त्यांच्या जीवनकथेत श्रावणाचा रंगही दाटून आलेला आहे. बालपण, शिक्षण, विवाह, सासर, महिला सक्षमीकरण आणि सण-उत्सवावर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

तुमचं बालपण कसं होतं?

उत्तर : माझं बालपण एकदम आनंदी वातावरणात गेलं. वडील बापूसाहेब मोहिते हे ज्येष्ठ नगरसेवक, घरात कायम राजकीय चर्चांचा माहोल असायचा. आई सामाजिक कामात व्यस्त, पण सणवार कधीही चुकत नव्हते. सण-वारांचे संस्कार लहानपणापासूनच घरातून मिळाले. एकत्रित कुटुंबात वाढल्याने प्रत्येक सणाला आत्या, चुलत भाऊ-बहिणी एकत्र जमून घर गजबजून जायचं. श्रावण महिन्याची पहिली चाहूल नागपंचमीला लागायची. मोठ्या बागेत झोपाळे बांधायचो. शिवाजी पार्कमधल्या मोठ्या अंगणात मैत्रिणींसोबत खेळणं हे लहानपणाचं खास सुख होतं.

शालेय प्रवास कसा होता?

उत्तर : ताराराणी मुलींच्या शाळेत माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं. शाळा घराजवळच असल्याने रोज आनंदाने जायचे. झिम्मा फुगडीसह प्रत्येक खेळाचा मनमुराद आनंद लुटला. आजही पाचवीपासून तयार झालेला 11 मैत्रिणींचा ग्रुप तसाच घट्ट टिकून आहे. त्यातील एक मैत्रीण गोव्याला, एक पुण्याला, एक सुरतला, एक ठाण्याला आहे. वेगवेगळ्या शहरांत असूनही तीन महिन्यांनी गेट-टुगेदर हमखास होतो.

लहानपणीचा एखादा किस्सा सांगा

उत्तर : आमरसाचा सिझन आला कि मला भातात आमरस घालून खायची सवय होती. आमरसाची वाटी संपत असेल तर भाताबरोबर खायची सवय होती. मला अजून देखील आठवतय की घरच्यांना हे वेगळं वाटायचं आणि सगळे हसायचे, पण त्यांना पाहून मला अजूनच गंमत यायची.

तुमच्या आठवणीतला माहेरचा श्रावण कसा असायचा?

उत्तर : रक्षाबंधन हा सण खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. त्यामुळं रक्षाबंधन आलं की खूप आनंद व्हायचा. माझी एक मोठी बहीण, काकांची एक मुलगी आणि मला आई एकसारखे ड्रेस शिवायची. स्प्रिंगच्या बांगड्या आणयची. आमच्या आत्या घरी यायच्या, आम्ही सगळी भावंडं एकत्र यायचो.

महिला सक्षमीकरणाबद्दल काय सांगाल?

उत्तर : महिला सक्षमीकरणासाठी ‘भगिनी मंच’ हे व्यासपीठ उभारलं आहे. गेल्या 12 ते 15 वर्षापासून महिलांना रोजगार, प्रशिक्षण आणि अडचणी सोडवण्याचे काम या मंचातून होत आहे. प्रत्येक महिलेला स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

लग्नाचा प्रस्ताव कसा आला, सासरी श्रावण कसा साजरा करता?

उत्तर : आमचं लग्न हे लव्ह मॅरेज. साहेबांच्या घरी आधीच माहित असल्याने काही अडचण आली नाही. माझ्या घरच्यांनी थोड्या दिवसांनी परवानगी दिली. सासूबाई अतिशय प्रेमळ आणि शिस्तप्रिय होत्या. सण-वार, श्रावणातील उपवासाचे पदार्थ बनवण्याचं आणि घराची उबदार एकत्रता जपण्याचं त्यांनी मला शिकवलं. सोमवारच्या उपवासाला मुगाची कोशिंबीर, श्रावण घेवड्याची भाजी, अळूची वडी असायची. दर शुक्रवारी पुरण पोळी, बटाट्याची भाजी, भजी असा नैवेद्य असायचा.

श्रावणातला कोणता पदार्थ साहेबांना आवडतो?

उत्तर : श्रावण महिन्यात नागपंचमीनिमित्त भावाचा उपवास असतो त्यादिवशी आपण जी थालीपीठ करतो ती त्यांना खूप आवडतात. त्यामुळं थालीपीठ हा पदार्थ आमच्या घरी वारंवार होत असतो. सासूबाईंनी पहिल्यांदा मला शेवय्याची खीर बनवायला सांगितली होती.

श्रावणातला कोणता किस्सा तुमच्या लक्षात राहतो?

उत्तर : श्रावणतल्या प्रत्येक सोमवारी 108 जोड्यांना आम्ही वाढतो. त्या जोड्यांचं स्वागत करून त्यांना व्यवस्थित मानपान करून त्यांना जेवायला घालणं, मला खूप आवडतं. आणि ती पध्दत अजून सुध्दा सुरू आहे.

मंगळागौर तुम्ही खेळता का?

उत्तर : लहानपणापासून मंगळागौर खेळले आहे. माझ्या माहेरी सुध्दा गौरी गणपतीत, श्रावणात हे खेळ आम्ही खेळत होतो. त्यामुळं त्याची मला खूप आवड आहे.

एकत्र पहिला चित्रपट कोणता पाहिला, कुटुंबासोबत ट्रिप होतात का?

उत्तर : साहेबांसोबत पाहिलेला पहिला चित्रपट ‘चांदणी’ होता. वर्षातून दोन मोठ्या ट्रिप होतात. इतर वेळेला जसं जमेल तसं आम्ही जातो.

तुमचा दिनक्रम कसा असतो?

उत्तर : सकाळी 7 वाजल्यापासून दिनक्रम सुरू होतो. देवाची पूजा करणे, नाष्ट्याला जे काही पदार्थ लागतात ते करणे. नातवंडं 8 वाजता स्कूलला जातात. त्यामुळं थोडी गडबड असते.

साहेब तुम्हाला, कुटुंबाला वेळ देतात का?

उत्तर : ते कुटुंबाला खूप जपतात. नातवंड, मुलांसह कुटुंबासाठी ते वेळ देतात.

माहेरीची आठवण कधी येते का?

उत्तर : कोल्हापुरातीलच शिवाजी पार्कमध्ये माहेर असल्याने जवळ आहे. पण जबाबदाऱ्यांमुळे फार वेळा जाणं जमत नाही. लांब असतं तर कदाचित ओढ अजून जास्त लागली असती.

लहानपणी तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नातं कसं होतं?

उत्तर : माझं आणि वडिलांचं नातं खूप चांगलं होतं. वडील प्रेमळ आणि संस्कार देणारे होते. एकत्र कुटुंब कसं असावं हे त्यांनी शिकवले.

Advertisement
Tags :

.