श्रवणचा मृत्यू गळा आवळल्याने,जखमाही मृत्यूस कारणीभूत!
शवविच्छेदन अहवालात झाले स्पष्ट : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
वाळपई : नगरगाव आंबेडे येथे सोमवारी सकाळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळलेल्या श्रवण बर्वे याच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे की श्रवण देविदास बर्वे (24) याचा मृत्यू गळा आवळल्याने श्वास कोंडल्याने झाला आहे. त्याच्या शरीरावरील जखमा ताज्या तसेच मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. श्रवण देविदास बर्वे याचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले होते. उत्तररीय तपासणी अहवालामुळे आता यासंदर्भाची गुंतागुंत वाढलेली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वाळपई पोलिस काल बुधवारी दिवसभर तपासामध्ये व्यस्त होते. कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
घातपातामुळे मृत्यू
श्रवण बर्वे याचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. बुधवारी दुपारी उत्तरीय तपासणी करण्यात आली. तिचा अहवाल संध्याकाळी प्राप्त झाला. अहवालामध्ये श्रवण बर्वे याचा मृत्यू त्याचा गळा आवळल्याने व श्वासोच्छ्वास कोंडल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय दूर झालेला आहे. त्याच्यावर घातपाताची शक्यता निर्माण झालेली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत श्रवण तेथील श्रीहनुमान मंदिरानजीक असलेल्या घरातील मित्रांसमवेत आयपीएल क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी बसला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सामना संपल्यानंतर तो घरी झोपण्यासाठी गेला होता. यामुळे रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सदर घातपात झाल्याचा अंदाज आहे.
सकाळी सापडला मृतावस्थेत
मंगळवारी सकाळी श्रवणचा मृतदेह अंगणामध्ये आढळला होता. यावेळी त्याच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यांचा मोबाईल घरामध्येच होता. सकाळी त्याचे वडिल होंडा भागातून घराकडे आले असता श्रवण त्यांना मृतावस्थेत सापडला होता.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
बुधवारी दुपारी श्रवण यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मित्रपरिवार व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
रात्री फोनवरुन झाले होते बोलणे
स्थानिक नागरिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रवणचे कुणाशीही वैर नव्हते. असे असताना त्याचा घातपात कसा झाला याबाबत त्याच्या मित्रांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. श्रवण आपल्या आंबेडे येथील घरामध्ये अनेकदा एकटाच रहायचा. त्याचे वडील, आई व भाऊ होंडा या ठिकाणी असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये अधून मधून राहायला जात होते. ज्या दिवशी श्रवणच्या खुनाची घटना घडली त्या रात्री श्रवण आंबेडेच्या घरात एकटाच होता. वडिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वडील व श्रवण यांचे फोनवरून बोलणे झाले होते.