बायोपिकमध्ये झळकणार श्रद्धा कपूर
लक्ष्मण उतेकर यांचा चित्रपट
मागील वर्षी ‘स्त्री 2’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या नव्या चित्रपटाबद्दल माहिती समोर आली आहे. श्रद्धाने आता ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत आगामी चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. हा एक बायोपिक असून यात श्रद्धा एका महान व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येईल. श्रद्धाच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘ईथा’ असल्याचे समजते. याचे चित्रिकरणही सुरू झाले आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी कलाकार राहिलेल्या विठाबाई नारायणगावकर यांचा बायोपिक असून यात श्रद्धा त्यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. समाजात महिलांना स्वत:चे कौशल्य आणि कला दाखविण्याची संधी नसलेल्या काळात विठाबाई यांनी लावणीनृत्याद्वारे लोकांची मने जिंकली होती. विठाबाई यांना तमाशासम्राज्ञी असे म्हटले जात होते. ‘ईथा’ चित्रपटात श्रद्धा ही विठाबाई नारायणगावकर यांचा संघर्ष, ध्यास आणि निर्धाराची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. तसेच श्रद्धा कपूर ही पुढील काळात स्वत:च्या प्रियकरासोबत एका बायोपिकवर काम करत आहे. या चित्रपटाचे कामही सुरू झाले आहे. परंतु यासंबंधी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. श्रद्धा कपूर पहिल्यांदाच बायोपिकमध्ये दिसून येणार असल्याने तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.