For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्राची बंगाल टायगर्सची विजयी सलामी

06:39 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्राची बंगाल टायगर्सची विजयी सलामी
Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisement

2026 च्या हॉकी इंडिया पुरूषांच्या लीग स्पर्धेला माजी विजेत्या श्राची बंगाल टायगर्सने शानदार विजयाने आपल्या मोहीमेला प्रारंभ करताना जेएसडब्ल्यू सुरमा क्लबचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात वेदांत कलिंगा लान्सर्सने रांची रॉयर्ल्सचे आव्हान 4-2 असे संपुष्टात आणले.

श्राची बंगाल टायगर्स आणि सुरमा क्लब यांच्यातील सामना बंगाल टायगर्सतर्फे सुखजित सिंगने 33 व्या मिनिटाला, अभिषेकने 45 व्या मिनिटाला तर गुरूसेवक सिंगने 60 व्या मिनिटाला गोल नोंदविले. सुरमा क्लबतर्फे एकमेव गोल प्रभज्योत सिंगने 54 व्या मिनिटाला केला. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंनी पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत परस्परांवर आक्रमक चढाया केल्या. त्यांना आपले खाते उघडता आले नाही. दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत गोल कोंडी फोडण्याचा प्रयत्न उभय संघांनी केला. पण त्यांना यश लाभले नाही. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता.

Advertisement

सामन्याच्या उत्तराधार्थाला प्रारंभ झाल्यानंतर 33 व्या मिनिटाला सुखजित सिंगने श्राची बंगाल टायगर्सचे खाते उघडले. टॉम ग्रॅमबुशने पेनल्टी कॉर्नरवर मारलेल्या फटक्याला सुखजित सिंगने गोलपोस्टच्या दिशेने केवळ दिशा दाखविली. यानंतर मात्र श्राची बंगाल टायगर्सने सुरमा क्लबवर चांगलेच दडपण आणले. 45 व्या मिनिटाला बचावळफळीतील अभिषेकने मैदानी गोल करुन सुरमा क्लबवर आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन गोल नोंदविले गेले. 54 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नवर प्रभज्योत सिंगने सुरमा क्लबचे खाते उघडून श्राची बंगाल टायगर्सने घेतलेली आघाडी थोडी कमी केली. पण 60 व्या मिनिटाला गुरूसेवक सिंगने सुरमा क्लबच्या बचावफळीतील खेळाडूंना हुलकावणी देत रिकामे असलेल्या गोलपोस्टमध्ये आरामात गोल केला. श्राची बंगाल टायगर्सचा हा तिसरा गोल ठरला. अखेर सुरमा क्लबला हा सामना गमवावा लागला.

वेदांत कलिंगा विजयी

या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात वेदांत कलिंगा लान्सर्सने रांची रॉयर्ल्सचे आव्हान 4-2 असे संपुष्टात आणले. रांची रॉयल्सतर्फे अॅलेक्सझांडेर हेन्ड्रीक्सने 7 व्या आणि 28 व्या मिनिटाला असे दोन गोल तर गुरसाहिबजित सिंगने 16 व्या आणि 26 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. रांची रॉयल्सतर्फे टॉम बून आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला रांची रॉयल्सचे खाते टॉम बूनने उघडले. 7 व्या मिनिटाला वेदांता कलिंगाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हेन्ड्रीक्सने अचूक गोल नोंदवून आपल्याला संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 9 व्या मिनिटाला मनदीप सिंगने मैदानी गोल करुन रांची रॉयल्सची आघाडी 2-1 अशी मिळवून दिली. 16 व्या मिनिटाला गुरसाहिबजित सिंगने वेदांत कलिंगा लान्सर्सचा तिसरा गोल केला. 26 व्या मिनिटाला गुरसाहिबजित सिंगने संघाचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. 28 व्या मिनिटाला हेन्ड्रीक्सने मैदानी गोल केला. मध्यंतरापर्यंत वेदांत कलिंगा लान्सर्सने रांची रॉयल्सवर 4-2 अशी आघाडी घेतली होती. 42 व्या मिनिटाला कलिंगा लान्सर्सला पाठोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण त्याचा लाभ त्यांना घेता आला नाही आणि शेवटी वेदांत कलिंगाने हा सामना 4-2 शा फरकाने जिंकून पूर्ण गुण वसुल केले.

Advertisement
Tags :

.