श्राची बंगाल टायगर्सचा विजय
वृत्तसंस्था / रांची
महिलांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात श्राची बंगाल टायगर्सने एसजी पायपर्सचा सडनडेथमध्ये 1-0 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 3-3 असे गोलबरोबरीत होते. या सामन्यात पेनल्टी शूटआऊटनंतरही गोलकेंडी कायम राहिल्याने श्राची बंगाल टायगर्सला लालरेमसियामीने सडनडेथमध्ये निर्णायक गोल करुन विजय मिळवून दिला.
हा सामना सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत चुरशीचा झाला. या विजयाबरोबरच श्राची बंगाल टायगर्सने बोनस गुण वसुल केला. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर निर्धारीत वेळेत श्राची बंगाल टायगर्सतर्फे ऑगेस्टिना गोर्झेलेनीने 6 व्या आणि 18 व्या मिनिटाला असे दोन गोल तर लालरेमसियामीने 11 व्या मिनिटाला गोल नोंदविले. एसजी पायपर्सतर्फे लोला रिएराने 10 व्या आणि 60 व्या मिनिटाला असे दोन गोल तर सुनेलिता टोपोने 59 व्या मिनिटाला एक गोल नोंदविला. या सामन्यात श्राची बंगाल टायगर्सने सुरूवातीपासूनच आक्रमक चढायांवर भर दिला. 6 व्या मिनिटाला ऑगेस्टिनाने श्राची बंगाल टायगर्स संघाचे खाते उघडले. मात्र त्यांना ही आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. 10 व्या मिनिटाला लोला रिएराने एसजी पायपर्सला बरोबरी साधून दिली. पुढच्याच मिनिटाला म्हणजे 11 व्या मिनिटाला श्राची बंगाल टायगर्सने पुन्हा एसजी पायपर्सवर आघाडी मिळविली. हागोल लालरेमसियामीने केला. 18 व्या मिनिटाला ऑगेस्टिनाने श्राची बंगाल टायगर्सचा तिसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत श्राची बंगाल टायगर्सने एसजी पायपर्सवर 3-1 अशी आघाडी मिळविली होती. सामना संपण्यास केवळ 5 मिनिटे बाकी असताना एसजी पायपर्स संघातील लोला रिएरेना तसेच सुनेलिता टोपोने प्रत्येकी 1 गोल करुन निर्धारीत वेळेपर्यंत ही लढत 3-3 अशी बरोबरीत रोखली. गोलकोंडी फोडण्यासाठी पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पण त्यामध्ये पुन्हा बरोबरी राहिल्याने अखेर सडनडेथचा वापर केला आणि लालरेमसियामीने विजयी गोल नोंदवून एसजी पायपर्सचे आव्हान संपुष्टात आणले.