श्राची बंगाल टायगर्स, पायपर्स विजयी
वृत्तसंस्था/ रांची
येथे सुरु असलेल्या 2026 च्या महिलांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील झालेल्या विविध सामन्यात श्राची बंगाल टायगर्सने रांची रॉयल्सचा तर एसजी पायपर्सने सुरमा हॉकी क्लबचा पराभव करत पूर्ण गुण वसूल केले.
या स्पर्धेतील झालेल्या रविवारच्या सामन्यात ऑगेस्टिना गोर्झेलेनीच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर श्राची बंगाल टायगर्सने रांची रॉयल्सचा 1-0 असा निसटता पराभव केला. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात बंगाल टायगर्सने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले. रांची रॉयल्सने या स्पर्धेत आपल्या दमदार मोहिमेला प्रारंभ करताना यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकले होते. खेळाच्या पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत रांची रॉयल्सला 5 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण बंगाल टायगर्सच्या भक्कम बचाफळीमुळे रांची रॉयल्सला आपले खाते उघडता आले नाही. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल नोंदविता आला नाही. मात्र खेळाच्या उत्तरार्धात शेवटच्या सत्रामध्ये मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा गोर्झेलेनीने अचूक फायदा घेत श्राची बंगाल टायगर्सचा विजयी गोल केला. या स्पर्धेतील गोर्झेलेनीचा हा चौथा गोल आहे.
सुरमा क्लब पराभूत
या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या एका सामन्यात एसजी पायपर्सने सुरमा हॉकी क्लबचा 3-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. या सामन्यात एसजी पायपर्सतर्फे लोला रिएरेने 13 व्या मिनिटाला, ज्योती सिंगने 18 व्या मिनिटाला तर सुनेलिता टोपोने 58 व्या मिनिटाला गोल नोंदविले. सुरमा क्लबतर्फे एकमेव गोल पेनी स्क्विबने 12 व्या मिनिटाला केला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला स्क्विबने पेनल्टी कॉर्नरवर सुरमा क्लबचे खाते उघडून आघाडी मिळवून दिली. पण त्यांना ही आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. एसजी पायपर्सने आक्रमक खेळ करत पाठोपाठ 2 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. दरम्यान लोला रिएराने पेनल्टी कॉर्नरवर एसजी पायपर्सला बरोबरी साधून दिली. 18 व्या मिनिटाला ज्योती सिंगने मैदानी गोल करुन एसजी पायपर्सला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत पायपर्सने सुरमा क्लबवर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. सामना संपण्यास केवळ 2 मिनिटे बाकी असताना सुनेलिता टोपोने पायपर्सचा तिसरा गोल नोंदवून सुरमा क्लबचे आव्हान संपुष्टात आणले. या विजयानंतर एसजी पायपर्सचा संघ गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे.