माफीवीरांना घरचा रस्ता दाखवा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल : मुंबईत महाविकास आघाडीचे सरकारला जोडे मारो आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे रविवारी आंदोलन केले. आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. मुंबईत झालेल्या आंदोलना वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार यांनी ‘या’ माफीवीरांना घरचा रस्ता दाखवा असे म्हणत, हा फुले शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवायचा आहे. आपल्याला या शिवद्रोही सरकारला चलेजावचा नारा देणार आहोत असा हल्लाबोल करत त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हे सरकार पुन्हा येऊ देणार नसल्याची शपथ जनतेने घेतली
मोदींनी माफी मागितली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी आम्ही राजकारण करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ज्या दिवशी महाराजांचा अपमान झाला, तेव्हाच राज्यातील जनतेने शिवाजी महाराजांची माफी मागितली. आम्ही हे सरकार चुकून निवडून दिले, खोके सरकार निवडून दिले याची माफी जनतेने मागितली आहे. आम्ही पुन्हा हे सरकार राज्यात येऊ देणार नाही अशी शपथ जनतेने घेतली आहे. जे माफीवीर लोकं आहेत, मोदी असो की शिंदे असो हे केवळ निवडणुकीसाठी माफी मागत आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे धक्कादायक विधान केले. राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमूना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. हा जनमानसात समज निर्माण झाला आहे. हा शिवप्रेमी लोकांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले.
सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपची पेशवाई : नाना पटोले
भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही. राज्यात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सतेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वफत्ती आहे. असा घणाघाती प्रहार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींनी माफी का मागितली : उद्धव ठाकारे यांचा सवाल
तर ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराजांची थट्टा करता का असा सवाल विचारत मोदी माफी मागत असताना त्यातील एक हाफ मुख्यमंत्री हसत होते असल्याची माहिती दिली. मोदींनी माफी कां मागितली असें विचारत पुतळा कोसळला म्हणून मागितली की पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली. असा सवाल केला. मोदी सिंधुदुर्ग जिह्यात निवडणुकीसाठी आले. घाई घाईत पुतळा उभारण्याची गरज नव्हती. घाई घाईत बांधलेलं सगळं कोसळतंय. म्हणून त्या त्या ठिकाणी तुम्ही मागणार कां असा सवाल ही ठाकरे यांनी उपस्थित केला. हा भ्रष्टाचार आता पुरे करा. महाराष्ट्रची माफी मगऊरीने मागून चालणार नाही. पुतळा कोसळण्या प्रकरणी महाराष्ट्र तुम्हाला कधी माफ करणार नाही असें सांगत यां सरकारला गेट आऊट ऑफ इंडियां बोलण्याची हिच वेळ असल्याचे ठाकरे म्हणाले.
पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही: शाहू महाराज
खासदार शाहू महाराज यांनीही या मोर्चात सहभागी होत सरकारवर टीकास्त्र सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनता संतप्त झाली आहे. हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, ज्यांनी हे केले त्यांना माफी नाही. जे लोक याप्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे, त्याप्रमाणे आपली पावले पडली पाहिजेत, असे शाहू महाराज म्हणाले.
शाहूंचा हात हातात धरत, शरद पवार मैदानात
हुतात्मा पार्क ते गेटवे ऑफ इंडिया अशा पायी मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज हे सहभागी झाले होते. प्रकृती बरी नसतानाही खासदार शाहू महाराज पायी मोर्चात सहभागी होते. शरद पवार हे पायाला जखम असल्यानं पट्ट्या बांधून अनवाणी पायाने चालत होते. शरद पवार आणि शाहू महाराज यांचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने शेअर केला आहे.