छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना जागा दाखवा!
वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ मालवण येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे आवाहन
प्रतिनिधी/ मालवण
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्याचा सुड घेणार नसाल, तर छत्रपतींचा जयजयकार करण्याचा अधिकार राहणार नाही. ज्या अशुभ हातांनी पुतळा उभारला, त्या भाजप व मिंधेंच्या उमेदवारांना एकही मत न देता, वैभव नाईक यांच्या मशाल निशाणीला मत देऊन विधानसभेत पाठवा, असे आवाहनात्मक प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित जाहीर प्रचार सभेत केले.
वैभव तुला 50-50 खोके मिळाले असते, मंत्रीपदाचीही ऑफर आली होती, पण तू वाकला नाहीस, दबला नाहीस, त्याचबरोबर मिंध्यांप्रमाणे मोदी-शहांचा लाचार झाला नाहीस, त्यामुळे वैभव तुझा मला अभिमान आहे, असे सांगत ठाकरे यांनी वैभव नाईक यांचे कौतुक केले.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हाप्रमुख संजय पडते, उबाठाचे उपनेते गौरीशंकर खोत, माजी आमदार परशुराम उपरकर, उपनेत्या जान्हवी सावंत, भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिल्पा खोत, नितीन वाळके, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व्हीक्टर डान्टस, काँग्रेस तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, पूनम चव्हाण, उबाठा शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुकाप्रमुख दीपाली शिंदे, उबाठा जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, युवा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, बाळू अंधारी, नीनाक्षी शिंदे, बाळ महाभोज, श्रीकृष्ण तळवडेकर, प्रमोद कांडरकर, उमेश मांजरेकर, श्वेता सावंत, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, युवा तालुकाप्रमुख मंदार गावडे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, मंदार ओरसकर आदी मान्यवर उपस्थित होते. तारकर्लीच्या माजी सरपंच स्नेहा केरकर आणि ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र केरकर व त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाठात प्रवेश केला.
ठाकरे यांचे फटाक्यांच्या आतबाजीत व शिवसेनेचा जयघोष करत स्वागत करण्यात आले. त्यामुळे आसमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात झाली. ठाकरे यांनी आज तुळशीचे लग्न असूनही तुम्ही केवळ नी केवळ शिवसेनेच्या प्रेमासाठी आणि वैभव नाईक यांना विजयी करण्यासाठीच उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात ठाकरे यांना प्रतिसाद दिला.
लोकसभेचा पराभव चटका लावून गेला!
ठाकरे म्हणाले, लोकसभेला कमी पडलो. त्यामुळे कोकणातला पराभव मला चटका लावून गेला. कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण हे नाते कोणी तोडू शकत नाही. कोकणावर कोणतेही संकट आले, तर शिवसेना धावून येते आणि सेनेवर संकट आले, तर कोकण धावून येते. आज शिवसेनेला कोकणची साथ हवी आहे. शिवसेना आणि अख्खा महाराष्ट्र संकटात आहे. त्यामुळे कोकणचे वैभव टिकविण्यासाठी तुम्हाला वैभवच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
मोदी व शहा शिवसेनेला संपवू निघालेत!
भाजपने मला संपवायचा प्रयत्न केला. आजसुद्धा त्यांचा तो प्रयत्न चालला आहे. पण मी जो काही आहे ते तुमच्या भरवशावर आहे. तुम्ही जोपर्यंत साथसोबत द्याल, तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. मोदी-शहा मला संपवू शकत नाहीत. तुमच्या ऊपाने आई जगदंबेने मला सुरक्षा कवच दिलं आहे, अशी भावनिक साद ठाकरे यांनी घातली. आज मोदी व शहा शिवसेना संपवायला निघाले आहेत. पण एवढे प्रकार राजकारणात कधीच झाले नव्हते. पक्ष फुटतात, कधी माणसे या पक्षातून त्या पक्षात जातात. पण एवढा नीचपणा आतापर्यंत कोणीत्याही राजकीय पक्षाने केला नाही. कोणे एकेकाळी असलेल्या मित्रपक्षानेच नीचपणा केल्याने मला दु:ख झाले व याचा रागही आला आहे, असेही ठाकरे म्हणाले.
...तर महाराष्ट्रात भाजप औषधालाही दिसली नसती!
महाराष्ट्रात भाजप नव्हती पण तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भूतदया, माणुसकी, आपले भगवे नाते, हिंदूत्व म्हणून सोबत घेत खांद्यावर घेतले. पण ते एवढे नीच निघाले, काम झाल्यावर वापरून फेकून द्यायला निघाले. बाळासाहेबांनी तेव्हा दूर ठेवले असते, तर आज भाजप औषधालाही महाराष्ट्रात दिसली नसती, असे सांगत ठाकरे यांनी मोदी, शहांवर निशाणा साधला. निष्ठा कधी विकली जात नाही. तुमच्या ऊपाने आई जगदंबेने मला सुरक्षा कवच दिलं आहे, असे ठाकरे म्हणाले.
शिवसेनेची मशाल सर्वत्र पेटते!
लोकसभा निवडणुकीसाठी जी गर्दी होत होती, ती एका-एका विधानसभा मतदारसंघासाठी होत आहे. या सभेसाठी प्रचंड गर्दी झाली आहे, असे ठाकरे यांनी सांगत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाल पेटली असून आता सत्तेची मशाल प्रज्वलित होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. आता कोकणात चांगली सुरुवात होणार आहे. आता आपल्या हातात मशाल आहे, त्यामुळे अंधार होण्याची भीती नाही. मशाल धगधगत ठेवा आणि कोकणात भगवा डौलाने फडकू द्या. महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून येणारच आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नशिबाने दिले, घरी बसून नीट खा!
खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना रस्त्याने जाऊन दाखवा, या दिलेल्या आव्हानाचा धागा पकडत, ठाकरे म्हणाले, नशिबाने दिले, ते घरी बसून नीट खा. वेडावाकडे होऊ नका, आडवे आलात, तर आडवेच करू, असा इशारा देत तेवढी ताकद व हिंम्मत शिवसेनेत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
कोकणचे वैभव, की गुंडापुंडाचे राज्य?
नारायण राणे, आमदार नीतेश राणे, नीलेश राणेंवर दहशतीचा आरोप करून त्यांचा समाचार घेताना तुम्हा सगळ्यांना कोकणचे वैभव जपायचे आहे, की नाही, वैभव हवे, की नको, की पुन्हा गुंडापुंडांचे राज्य हवे? मागील गुंडागर्दीवेळी यांना वैभव एकटा नडला, आता आम्ही सगळे सोबत आहोत, असेही ठाकरे म्हणाले.
तुम्हाला त्यांची घराणेशाही - गुंडगिरी चालते का?
2005 मध्ये मी मालवणात आलो, तेव्हा येथील माणसांनी आम्हाला अडचणीला धावणारा एक माणूस द्या, असे सांगितले. मी विनायक राऊतांना येथे पाठविले, त्यांना तुम्ही दोनवेळा खासदार केले पण यावेळी काय चुकले, याचा तुम्हीच विचार करायला हवा, असे ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुखांनीच मला पक्षप्रमुखपद दिले. मग मोदी तुम्ही चोमडेपणा का करता, असा सवाल करीत बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला मदत केली, त्यांची घराणेशाही तुम्हाला दिसते, मात्र बाप व दोन मुलांची घराणेशाही चालते का, असा सवाल केला. तुमची हुकुमशाही गाडायला आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही शिवशाही आणणारच, असेही ठाकरे म्हणाले.
370 कलम हटविण्यास माझा पाठिंबा होता व आहे!
काश्मीरमधील 370 कलम काढताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता व कौतुकही केलेले, आजही समर्थन करतो. 370 कलम काश्मीरसाठी, देशासाठी महत्वाचे आहे. काश्मीर हे देशाचे अविभाज्य अंग आहे हे मान्य आहे. ते हवेच पण महाराष्ट्रात येऊन का सांगता? येथील शेतकऱ्यांच्या पिकांवर बोला, कांदा, सोयाबीनच्या हमीभावाबद्दल बोला, असे ठाकरे म्हणाले.
मर्दासारखे लढायला या!
शिवसेना संपवायची असेल, तर मर्द असाल, तर समोर येऊन लढा. सरकारी यंत्रणांची मदत घेऊन उगाच अडवणूक करून संपविण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यास तुम्हाला शिवसेना संपविणे कधीच शक्य होणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
आपला माणसाच्या पाठिशी राहा - विनायक राऊत
शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणेंची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी राज्यातून धनुष्यबाण हद्दपार करण्यासाठी बेडकासारखे डराव डराव केले होते. मात्र, त्याच धनुष्यबाणाने वैभव नाईक यांच्या रुपाने नारायण राणेंना जमीन-आस्मान दाखविले आणि राज्याच्या राजकारणातून राणेंना संन्यास घेण्यास भाग पाडले होते. तेच राणे आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांच्या पायऱ्या झिजवून पुन्हा धनुष्यबाण हाती घेण्यासाठी लाचार झालेत, असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेने आणि पैसे खाणाऱ्या व्यक्तींमुळे कोसळला. आपण पुतळा उभारल्यानंतर आठ दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेत लक्ष वेधले होते. मात्र, विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या प्रश्नांकडे शासनाला लक्ष देण्यास वेळ नसल्याने अखेर आठ महिन्यांतच भ्रष्टाचाराच्या चौथऱ्यावर उभा राहिलेला पुतळा कोसळल्याने छत्रपतींचा अपमान झालेला आहे. त्यामुळे शिवप्रेमींची मान शरमेने खाली झुकली आहे. याचा बदला घेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आपला माणूस म्हणून वैभव नाईक यांची ओळख आहे. जिल्ह्यातील विमानतळ बंद करण्याचा घाट घालण्यात येत आहे. यामुळे सिंधुदुर्गवासियांनी एकसंघपणे आता नाईक यांच्या पाठिशी राहिले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
जनता हिच माझी ताकद - वैभव नाईक
मी ठाकरे सेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता असून जनता हिच माझी ताकद आहे. गेल्या पंधरा वर्षांत सर्वसामान्यांच्या सुखदु:खात मी सहभागी होत असून प्रत्येकाच्या घरातील व्यक्ती म्हणून मला ओळखले जाते, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. गेले दहा वर्षे प्रामाणिकपणे काम करत असताना मतदारांशी किंवा पक्षप्रमुखांशी कधी गद्दारी केली नाही. शिवसैनिक म्हणून तुम्हीही आमच्या सोबत कट्टर राहिलात, गद्दारी केली नाही. यासारखे प्रामाणिकपणाचे उदाहरण दुसरे कोणतेच असू शकत नाही. नारायण राणे ज्या भगव्याला, धनुष्यबाणाला संपवायला निघाले होते. पण आज त्यांनाच दारोदारी फिरून त्याच धनुष्यबाणाला, शिवसेनेला मतदान करा, असे सांगावे लागत आहे. मी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून सर्वांसोबत राहिलो. मतदारसंघात काही कमी पडू दिले नाही. मलाही कोरोना झाला. त्यावेळी मी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले होते, असेही नाईक म्हणाले.
या तीन मतदारसंघांमध्ये तुम्ही पाहिल्यास, या कुडाळ-मालवण मतदारसंघाचा विकास झालेला दिसेल. या मतदारसंघात जास्तीत जास्त विकासाची कामे झालेली आहेत. पक्षप्रमुख ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना दिलेल्या विकासकामांची पाच वर्षे भूमिपूजने करत आहोत. येथे उपस्थित शिवसैनिकांकडे माझा फोन नंबर आहे. ते कधीही माझ्याशी बोलू शकतात. मी सर्वसामान्यांसोबत कनेक्ट असतो. विरोधी उमेदवाराने किती कामे केली आणि मी केलेला विकास यात भरपूर फरक जाणवून येईल. त्यामुळे मला विजयी करा, असे आवाहन नाईक यांनी केले. सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले. आभार तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मानले.
कोकणचे वैभव कायम राहायला हवे!
आज शिवसेना नाही, तर महाराष्ट्र अडचणीत आहे. म्हणून तुमची साथ मागतो, कोकणचे वैभव कायमचे हवे असेल, तर भगवा व मशालीशिवाय पर्याय नाही. लोकसभेप्रमाणे पुन्हा चुकलात, तर बाप व दोन्ही मुलांची लाचारी करावी लागेल. जसा वैभव इमानाने राहिला तसे तुम्ही राहा. विजय वैभव व मशालीचाच आहे, असेही ठाकरे म्हणाले.