गोव्याचा इतिहास, संस्कृती चित्रपटातून दाखवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : मराठी चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन
त. भा. प्रतिनिधी
पणजी : व्हिन्सन वर्ल्डतर्फे आयोजित 15 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे पणजीतील आयनॉक्स थिएटरमध्ये रसिक प्रक्षेक आणि मराठी कलाकारांच्या तुडूंब गर्दीत शानदार उद्घाटन झाले. गोवा व मराठीचे नाते अतुट असून गोव्यात कोकणी बोलतात, हिंदी चित्रपट पाहतात, इंग्रजीत लेखन होते तरीदेखील मराठी चित्रपट, मालिका, कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळतो. गोव्याचा इतिहास, संस्कृती चित्रपटातून दाखवा. गोव्यात या आणि शूटिंग करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. महोत्सवाचे प्रमुख पाहुणे या नात्याने समई प्रज्वलित करुन उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
गोवाभूमी शूटिंगसाठीही उत्तम ठिकाण
ते पुढे म्हणाले की, गोव्यातील विविध गावात शूटिंगसाठी अनेक जागा आहेत. पर्यटनासोबतच गोवा भूमी शूटिंगसाठी देखील महत्त्वाची आहे. ‘कम टू गोवा’, ‘शूट इन गोवा, क्रिएट इन गोवा’ या धोरणातून गोवा सरकार काम करीत आहे. गोव्याचा वापर केवळ समुद्रकिनारे, बार यासाठी न करता गावे, सांस्कृतिक ठिकाणे, मंदिरे, नैसर्गिक सौंदर्य यांना चित्रपटाच्या माध्यमातून स्थान द्या, अशी सूचना डॉ. सावंत यांनी केली.
दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होऊ शकते
गोव्याला चांगला इतिहास, समृद्ध संस्कृती, परंपरा यांचे मोठे देणे आहे. त्यावर आधारित अनेक कथा आणि गाथावर दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होऊ शकते. याकडे डॉ. सावंत यांनी सर्व कलाकारांचे लक्ष वेधले. गोवा मुक्तीसाठीचा लढा, सत्याग्रहृ पोर्तुगीजांविरोधातील उठाव हा इतिहास चित्रपटातून मांडण्याची चांगली संधी आहे, असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले.
मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी इतर मान्यवर मोठ्या संख्येने महोत्सवासाठी उपस्थित होते. आयनॉक्स थिएटर गर्दीने फुलून गेले होते. व्यासपीठ तर कलाकारांनी गच्च भरले होते. विन्सन वर्ल्डचे श्रीपाद शेटये, संजय शेटये यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले. उद्घाटनानंतर ‘बंडखोर’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो सादर करण्यात आला. रविवारपर्यंत हा महोत्सव चालणार असून त्यात 25 चित्रपट दाखवले जाणार आहेत.
मराठी, कोकणी चित्रपट निर्मितीसाठी सवलती
गोव्यात मराठी, कोकणी चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन तसेच सवलती दिल्या जातात. त्याकरीता गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे (ईएसजी) एक खिडकी योजना कार्यरत आहे. गोव्यात शूटिंग करणाऱ्या सर्वांना सहकार्य दिले जाते. सर्व परवाने देण्याची प्रक्रिया वरील योजनेतून सुटसुटीत करण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
मोहन जोशी यांना ‘जीवन गौरव’
मराठी चित्रपट, रंगभूमीतील ज्येष्ठ व नामवंत कलाकार मोहन जोशी यांना डॉ. सावंत यांच्याहस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि मानपत्र असे त्याचे स्वरुप आहे. यावेळी मानपत्राचे वाचन करण्यात आले. ईएसजीच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो या यावेळी हजर होत्या. या विशेष सत्कारामुळे खूप आनंद झाला असून गोवा सरकारने मराठी चित्रपटातील कलाकारांसह सर्वांवर असाच कृपाशीर्वाद कायम ठेवावा, असे मनोगत जोशी यांनी व्यक्त केले.
मराठी कलाकारांचे जास्त कौतुक गोव्यातच : सचिन खेडेकर
महाराष्ट्रातील मराठी कलाकारांचे सर्वात जास्त कौतुक फक्त गोव्यातच होते हे या महोत्सवाचे विशेष असून आम्हा कलाकारांसाठी गोवा म्हणजे पर्वणीच आहे. गोव्यातील रसिक प्रेक्षक जोरदार प्रतिसाद देतात आणि त्यातून चांगला अनुभव मिळतो, असे मनोगत अभिनेते सचिन खेडेकर यांनी वर्तवले.
उद्घाटनास नामवंत कलाकारांची मांदियाळी
मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्dयास नामवंत कलाकारांची मांदियाळी होती. रेणुका शहाणे, गजेंद्र अहिरे, महेश मांजरेकर, केदार शिंदे, सचिन खेडेकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, नेहा पेंडसे, छाया कदम, सीमा विश्वास, किशोर कदम, सई मांजरेकर, नेहा जोशी, मानसी कुकलर्णी, मयुरा प्रधान, मृण्मयी गोडबोले, नम्रता सिन्हा, प्रार्थना बेहेरे, मानसी पाटील, ईशिता देखमुख, प्रियदर्शिनी इंदुलकर, भूषण प्रधान, नवीन चंद्रा असे मराठीतील विविध कलाकारांचा त्यात समावेश होता. सर्व कलाकारांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे स्वागत आणि ओळख करुन देण्यात आली.