For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्य अधिकारी, बिम्स संचालकांना कारणे दाखवा

07:57 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरोग्य अधिकारी  बिम्स संचालकांना कारणे दाखवा
Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा ठपका, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव: अलिकडेच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान व्हीआयपी शिष्टाचार आणि वैद्यकीय सुरक्षिततेतील त्रुटींबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. ईश्वर गडाद आणि बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दि. 9 जुलै रोजी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. विकास आढावा बैठकीत त्यांनी सहभाग घेतला होता. या दौऱ्यादरम्यान स्पष्ट सरकारी निर्देश असूनही कर्तव्यात कसूर झाल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी नियमावलीनुसार मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना अत्याधुनिक जीवनरक्षक उपकरणांची सुसज्ज असलेली अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट (एएलएस) रुग्णवाहिका आणि तज्ञ डॉक्टरांचे पथक नेमणे अनिवार्य आहे. मात्र आरोग्य खात्याकडून केवळ एक सामान्य रुग्णवाहिका तैनात करून मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य सुरक्षिततेबाबत पोरखेळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले होते, त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याऐवजी नियमांचे उल्लंघन करून पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांना (पीजी) नियुक्त करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौराकाळात वैद्यकीय पथकाच्या संपर्कात न राहता, तसेच जिल्हा प्रशासनाशी समन्वय न साधता दुर्लक्षपणा केल्याचा आरोपही आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या किमान सुविधा उपलब्ध न केल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिसीला सात दिवसांच्या आत योग्य आणि समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास सेवेतून निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.

नोटिसीला दोघांकडून उत्तर, योग्य ती कारवाई केली जाईल

अलिकडेच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी या नात्याने जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी आणि बिम्सच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिसीला दोघांनीही उत्तर दिले असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Advertisement
Tags :

.