Shoumika Mahadik Shravan Gappa: सण, संस्कार आणि माहेरच्या आठवणी, दिलखुलास संवाद
आयुष्यातील खास क्षणाविषयी शौमिका महाडिक यांच्याशी झालेला दिलखुलास संवाद..
By : दिव्या कांबळे, साजिद पिरजादे
कोल्हापूर : श्रावण म्हणजे फक्त सणांचा काळ नाही, तर आठवणींचा, गप्पांचा आणि बालपणीच्या गोड क्षणांचा महिना असतो. आणि या निमित्ताने श्रावण गप्पांमध्ये आपण भेटणार आहोत महाडिक घराण्याच्या सूनबाई आणि ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांना. घाटगे घराण्यातील बालपण, कॉलेज, हॉस्टेल लाईफ, स्वतंत्रपणे जगण्याचा संघर्ष, कौटुंबिक परंपरा आणि त्यांच्या आयुष्यातील खास क्षणाविषयी शौमिका महाडिक यांच्याशी झालेला दिलखुलास संवाद.
श्रावण आणि तुमच्या बालपणीचे किस्से सांगा ?
उत्तर : श्रावण सगळ्dयांसाठी खास असतोच. पण, आमच्या माहेरी त्यावेळी श्रावणासाठी विशेष तयारी नसायची. मात्र, नागपंचमी नेहमीच उत्साहात साजरी केली जायची. पूर्वी जिवंत नाग घरी आणून त्याची पूजा केली जायची. आम्हाला खूप उत्सुकता असायची कारण प्रत्यक्ष नाग बघायला मिळायचा. माझ्यासाठी नागपंचमी म्हणजे साडी नेसणं, गजरा घालणं आणि बांगड्या भरणं असायचं. सण म्हणजे फक्त नटणं एवढंच माहिती होतं.
कॉलेज आणि हॉस्टेल लाईफ कसं होतं?
उत्तर : मी अकरावीत असताना पुण्याला शिकायला गेले. हॉस्टेलमध्ये एक वर्ष राहिले. हॉस्टेलची लाईफ खूप छान होती. त्यावेळी मला मैत्रिणी मिळाल्या, ज्या आजदेखील माझ्या संपर्कात आहेत. हॉस्टेलमध्ये घरापासून दूर राहण्याचा अनुभव मिळाला. स्वत:ची कामं स्वत: करणं, आयुष्याची शिस्त शिकणं, हा टप्पा खूप महत्त्वाचा ठरला. बाबांचा संदेश होता, ‘एक चांगला मालक होण्यासाठी, उत्तम नोकर बनणं शिकावं लागतं.’ त्यामुळे स्वत:ची कामं स्वत: करणं ही शिस्त मला तिथे लागली. इतर विद्यार्थ्यांना जेवढे पैसे मिळायचे तेवढेच पैसे बाबा आम्हाला द्यायचे. त्यामुळे कमी बजेटमध्ये राहायची सवय लागली. कॉलेजमध्ये फार खोड्या केल्या नाहीत. पण, एकदा आम्ही क्लास बुडवून पिक्चरला गेलो आणि शिक्षकांचा ओरडा खाल्ला होता.
कॉलेजनंतर पुण्यातील जॉब कसा होता ?
उत्तर : कॉलेजनंतर मी दोन वर्षे मल्टिमीडियाचं शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातच इनहाऊस डिझाईन, रिटेलिंग अशा क्षेत्रात पाच-सहा वर्षे नोकरी केली. नोकरी शोधताना बाबांनी कोणतीच मदत केली नाही. ते म्हणायचे ‘जर तुझ्यात क्षमता असेल तर तू स्वत: उभी राहू शकतेस.’ त्यामुळे मी जाहिराती पाहून अर्ज केले, मुलाखती दिल्या आणि नोकरी मिळवली. या काळात मी संघर्ष अनुभवला. म्हणूनच मी माझ्या मुलांनाही सांगते, आयुष्यात आयतं काहीच मिळत नाही. संघर्ष करावा लागतो, कष्ट करावे लागतात. माझा आणि आमच्या घरचा एक नियम आहे, दिखावा करायचा नाही. साधेपणाने आणि जमिनीवर पाय ठेवून जगणं आम्हाला नेहमी आवडतं.
तुमच्या कोणत्या गोष्टीचा साहेबांना राग येतो?
उत्तर : त्यांचे पहिलं प्रेम म्हणजे गाड्या. गाड्या खराब होणे किंवा जोरात दरवाजा लावलेला त्यांना अजिबात आवडत नाही. कधीतरी माझ्याकडून असे काही झाले तर मला नक्कीच ओरडा मिळतो. पण, ते माझ्यावर चिडलेत, असे कधी झालेले नाही. आमच्यात एक अलिखित नियम आहे, मी चुकले तरी तेच ‘सॉरी’ म्हणतात, आणि ते चुकले तरी तेच ‘सॉरी’ म्हणतात.
लग्नाचा प्रस्ताव आणला की आला?
उत्तर : लग्नाचा प्रस्ताव आणला गेला. आमचं लग्न हे पूर्वनियोजित होते. आम्ही दोघेही एकाच शाळेत होतो. पण, साहेब माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे होते. शाळेत तोंडओळख झाली आणि नंतर आमचं बोलणं सुरू झालं. आणि तिथून पुढे आमची लव्ह स्टोरी सुरू झाली.
तुमच्या आयुष्यातील अतिशय सुदंर क्षण कोणता?
उत्तर : माझ्या दोन्ही मुलांचा जन्म हा माझ्यासाठी अतिशय सुदंर क्षण होता. कारण एखाद्या स्त्राrसाठी आई बनणं हा खूप अविस्मरणीय क्षण असतो. माझ्या मुलीचा जन्म, त्यानंतर मुलाचा जन्म हे दोन्ही क्षण माझ्यासाठी माझ्या आयुष्यात श्रावण फुलल्यासारखे होते.
लग्नातील अविस्मरणीय क्षण?
उत्तर : मला बघायला आले त्यावेळी महाडिक फॅमिली खूप मोठी होती. मला बघायला महाडिक फॅमिलीतील 40 लोकं येणार होती, त्याचे दडपण आमच्या घरी होते. एका महिन्यात आमचं लग्न झालं. आमचं लग्न पोलीस परेड ग्राउंडवर पार पडले. लग्नानंतर माहेरी परत आले तेव्हा प्रथेप्रमाणे ‘कृष्ण चोरायची’ प्रथा होती. त्यावेळी मी भावनिक झाले होते. कारण ‘आता या घराशी आपलं नातं संपलं, इथून पुढे मी पाहुणी म्हणूनच येणार,’ ही जाणीव मला रडवून गेली. तो क्षण आजही विसरता येत नाही.
माहेरच्या हळव्या आठवणी सांगा?
उत्तर : आम्ही बहीण भावांनी खूप वेळ एकमेकांच्या बरोबर घालवला आहे. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सगळे भाऊ-बहिणी कोल्हापूरबाहेर असलेल्या आमच्या घरात जमायचो. तिथे खूप मजा व्हायची. सुट्ट्यांमध्ये कुठे बाहेर फिरायला जायची गरजच वाटत नसे. कारण घरातच सगळा आनंद असायचा. लहानपणी आपण आई-बाबांपेक्षा भावंडांबरोबरच जास्त वेळ घालवतो, त्यांचीच संगत असते. त्या दिवसांच्या आठवणी आजही अविस्मरणीय आहेत. लहानपणी आई आणि आज्जीचा खूप मार खाल्ला आहे.
महाडिक घराण्यात श्रावणाची वेगळी परंपरा आहे का?
उत्तर : आमच्याकडे श्रावणात विशेष आणि वेगळं असं काही नसते. नागपंचमी, रक्षाबंधन, गौरी- गणपती हे सण उत्साहात साजरे केले जातात. माझ्या सासूबाई प्रत्येक गोष्ट विधीपूर्वक करतात.