समाजकारण, राजकारणासह कुटुंबही महत्वाचं, Shoumika Mahadik यांच्याशी दिलखुलास गप्पा
राजकारणात आल्यानंतर जिल्हा परिषदेत बऱ्याच गोष्टी शिकले
By : गौतमी शिकलगार, साजिद पिरजादे
कोल्हापूर : मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं, लग्नानंतर राजकारणात येईन, असं कधी वाटलं नव्हतं. पण राजकीय कुटुंबात लग्न झाले, अन् राजकारणात आले. राजकारणात आल्यानंतर जिल्हा परिषदेत बऱ्याच गोष्टी शिकले. जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यातील प्रत्येक घटकाची जबाबदारी ही माझी आहे, असे समजून मी काम केले.
आताही समाजाचा आवाज म्हणून शेतकऱ्यांसह अन्य प्रश्न मांडत आहे, हे माझ्यासाठी खुप महत्वाचं आहे. सामाजिक जीवनात येताना समाजासाठी चांगलं काम करायचं आहे, हा हेतू मनात ठेवून वाटचाल करत आहे, असे सांगत होत्या ‘तरूण भारत संवाद’च्या ‘श्रावणगप्पा’त शौमिका महाडिक....
तुम्ही साहेबांबरोबर पाहिलेला पहिला चित्रपट कोणता ?
उत्तर : हम आपके हैं कौन. आणि तो चित्रपट आम्ही नऊ वेळा बघितला. त्याच्यानंतर ‘दिलवाले दुल्हनिया..’ पण नऊ वेळा बघितला. तो जो काळ होता तेव्हा सगळे फॅमिली चित्रपट आले, म्हणजे दिलवाले दुल्हनिया, हम आपके हैं कौन, हम साथ-साथ हैं..., हे सगळे कौटुबिंक चित्रपट होते. ते छान वाटायचे. त्यांची लव्ह स्टोरी, मग त्यांच्या कुटुबांचा हस्तक्षेप, त्यानंतर कुटुंबाची मनं जपून प्रेम कसं सांभाळणं, हे सगळं यात दाखवलं आहे.
साहेबांसाठी कोणतं गाणं डेडीकेट कराल?
उत्तर : तू है तो दिल धडकता है..तू है तो सास आती है.. तू ना तो घर घर नही लगता.. तू है तो डर नही लगता..
राजकारणात कसे आलात ?
उत्तर : तुम्हाला करायचं एक असतं आणि तुमच्यासाठी नियतीनं काही वेगळंच ठरवलेलं असतं. मला फॅशन डिझाईन करायचं होतं, पण माझं लग्न राजकीय कुटुबांत झाले. तरी सुध्दा मी राजकारणात कधी येईन, हे माहिती नव्हतं. या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. जेव्हा अमलसाहेब पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांच्या जागी जिल्हा परिषद मला निवडायला लागली, अन् राजकारणात प्रवेश झाला. आमच्या घरी राजकरण हा विषयच कधी नव्हता. घरी राजकीय वातावरणच नव्हतं. जेव्हा मी राजकरणात आले तेव्हा बऱ्याच गोष्टी मला बाबांनी सांगितल्या. बाकी सगळे अनुभवी लोक आजूबाजूला होते, त्यांचे मार्गदर्शन होत होते. अमलसाहेब सोबत होते. नवीन होते, तेव्हा कशाचचं ज्ञान नव्हतं. नंतर शिकले. त्यासाठी वेळ दिला. जिल्हा परिषदेला गेल्यावर मी 7-8 वाजेपर्यंत थांबायची, हे शिकण्यासाठी की सरकारी कागदपत्रे वाचायची कशी असतात, या गोष्टी शिकले. लग्नाच्या 7 वर्षानंतर घरातून बाहेर पडले आणि हे सगळे शिकले.
घरची जबाबदारी आणि राजकारण दोन्ही कसे सांभाळता?
उत्तर : घर आणि राजकारण याबाबत खूप लकी आहे. एकत्र कुटुंबामध्ये राहते. त्यामुळे घरातलं सगळं करून बाहेर पडायचं आहे, असं कधी झालं नाही. माझ्यामागे कोणीतरी घर सांभाळायला आहे, आई असतील, वहिनी असतील. त्यामुळे कधी हा विचार आला नाही, की मी मुलांना सोडून जाऊ का? त्याबाबत खूप लकी आहे. त्यामुळे खूप त्रास झाला नाही, हे सांभाळताना. राजकारणात आले तेव्हा आईंनी सांगितले की, आम्ही आहे घर सांभाळायला, तुम्ही ते सांभाळा. घरची काही काळजी करू नका. त्यामुळे घरचं फारसं काही पहायला लागलं नाही.
तुम्ही आई झालात, तर या मातृत्वाच्या भावना काय आहेत?
उत्तर : शांभवी 7 वर्षांची होईपर्यंत मी तिला पूर्ण वेळ दिला. फक्त मला वीरला जास्त वेळ देता आला नाही. कारण वीर जन्मला, त्यानंतर मी जिल्हा परिषदेत अधिक होते. त्याच्याजवळ नव्हते, ही खंत आहे. पण नंतर जाणवलं की आपण मुलांना वेळ देत नाही. मुलांना तुमचा पुरेसा वेळ हवा असतो. कालांतराने मी शिकले की मुलांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. शक्यतो मी मुलांना वेळ देते. त्यांच्याशी बोलते, खेळते. सायंकाळी 7 नंतर शक्यतो फोन घेत नाही. कारण कर्तव्य आणि मातृत्व याचा तोल सांभाळता आला पाहिजे, त्यासाठी हा वेळ देते.
सासू आणि सून यात तुमचं दोघींचं नातं कसं आहे?
उत्तर : कधी मत-मतांतरं होतात. तस पाहिलं तर तो पिढीचा गॅप आहे आपल्या दोन पिढ्यांचा. मतं आमची वेगळी पडू शकतात. एखाद्या विषयामध्ये. एक घर सांभाळून ठेवणं, ते टिकवणं हे सासूची जबाबदारी असते. त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे.
स्वत:साठी वेळ कसा काढता?
उत्तर : शक्यतो रविवारी कार्यक्रम घेत नाही. रविवार मुलांसाठी असतो, फॅमिलीसाठी असतो. त्यामुळे आठवड्यातील एखादा दिवस पुरेसा असतो. एखादा दिवस मी स्वत:साठी देतेच. खूपच कंटाळा आला असेल तर फॅमिलीसोबत बाहेर फिरायला जाते. जेथे मोबाईलची रेंज नाही, तेथे कुठेही जा आणि मस्त फिरून या, असं असते.
लग्नानंतरची पहिली ट्रीप कोणती?
उत्तर : अशा खूप ट्रीप झाल्या, लग्नानंतरच्या. जेव्हा हनिमूनला गेलो होतो तीच एक अशी ट्रीप होती ज्यामध्ये आम्ही दोघे होतो. त्यानंतर दोघे असं कधी फिरायला गेलो नाही. आमचा एक मित्र-मैत्रिणीचा ग्रुप आहे. ती एक आमची फॅमिली आहे. आम्ही गेलो तर त्यांच्यासोबतच. नाही तर मग नाही जात. आम्ही दोघे गेलो होतो ते ठिकाण ऑस्ट्रेलिया आणि जयपूर.
महिला सक्षमिकरणासाठी काय काम करता, आठवणीतील क्षण कोणता?
उत्तर : मी कधी महिलांसाठी काम करायचे म्हणून बाहेर पडले नाही. जशी बाहेर पडली आहे तशी पूर्ण समाजासाठी काम करते. जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे पूर्ण जिह्याची जबाबदारी सांभाळावी लागली. जिह्यातील प्रत्येक घटकाची जबाबदारी ही माझी आहे, असे मानते. 2019 ला पूर आला होता तेव्हा एक महिला भेटायला आली. ती सांगत होती, तिचा मुलगा मतिमंद आहे, घरात त्या एकट्याच, कर्ता पुरुष नव्हता. पत्र्याच्या घरात राहत होती. मुलगा 2 दिवस कुठं गायब झालेला त्यांना माहीतच नाही, तो कुठं गेलाय. घरी जेवण नाही, नोकरी नाही. हे ऐकून, असं वाटलं की आपण हिच्यासाठी काय करू शकतो, पण मी त्यांना त्यावेळी पुरेशी मदत केली. हा क्षण अविस्मरणीय आहे.
कोणत्या ठिकाणी फास्ट फुड खाता ?
उत्तर : मला खाण्याची खूप आवड आहे मी बाहेर कधीही गेले तरी पाणीपुरी, भेळ नेहमी खाते. सासने मैदानाजवळ पाणीपुरी छान मिळते. तिथे जाऊन आम्ही पाणीपुरी खातो.
महिला सक्षमीकरणात काही नियोजित संकल्पना आहेत का ?
उत्तर : लहानपणापासून बघत आले, की कोल्हापूरमध्ये फारसा बदल झाला आहे, असं वाटत नाही. आता सुदैवाने खूप चांगले प्रकल्प आणले आहेत. ते यशस्वी झाले तर खरोखरच कोल्हापूरची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. त्याच्यासाठी लोकांनी चांगले लोकप्रतिनिधी निवडणे खूप गरजेचे आहे. आता सुरूवात लोकांनी केलेली आहे आणि यापुढे पण करत राहतील, अशी आशा आहे. जे लोकांसाठी काम करते किंवा गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे काम करत आहे. यातून कोणाचा तरी आवाज बनण्याचं काम करते आहे. एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समाजाचा आवाज म्हणून त्यांचे प्रश्न मांडते, हे खूप महत्वाचं आहे. महिलांनी कुटुंबावर लक्ष देणं गरजेचं आहे. कुटुंब मजबूत असेल तर जीवनात काहीही मिळवू शकतो. कुटुंबाला सोडून काही करू नका. कुटुंब महत्वाचं आहे, नाती महत्त्वाची आहेत, परंपरा महत्वाच्या असतात, कारण स्त्राrने त्या परंपरा पुढे चालवायच्या असतात. तिच्याकडूनच पुढची पिढी शिकत असते. मग ते आई म्हणून शिकवा किंवा सासू म्हणून शिकवा. त्यामुळं परंपरा टिकवणं, पुढच्या पिढीला देणं, कुटुंब सांभाळणं हे सगळं करून तुम्ही सामाजिक जीवनात या. सामाजिक जीवनात येताना मला काहीतरी बदल करायचा आहे आणि समाजासाठी चांगलं काम करायचं आहे, म्हणून मी येते. आपण सामाजिक क्षेत्रात एकमेकांना मदत करण्यासाठी येत असतो. तिथे तुम्ही हेवेदावे आणू नयेत. मोठ्या पदावर येण्यासाठी या गोष्टी बाजूला ठेवून महिलांनी काम केलं पाहिजे. श्रावण स्पेशल
उखाणा
उत्तर : शिवरायांनी गड जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने, अमल साहेबांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने..
पर्सनल आयुष्याबद्दल मत काय?
उत्तर : आमचंसुद्धा पर्सनल आयुष्य असतं. लोकप्रतिनिधी आहे म्हणून आम्ही 24 तास उपलब्ध असले पाहिजे, ही जी कल्पना आहे ती खूप चुकीची आहे. कारण आम्हाला पण पॅ ढमिली लाईफ असते, आमची सुद्धा नाती जपायची असतात, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.