Gokul Sabha 2025: राजकीय सोयीसाठी 25 संचालक करण्याचा घाट, शौमिका महाडिक यांचा आरोप
वरिष्ठ पातळीवरुन ठरल्याप्रमाणे आम्ही सभेच्या सुरुवातीपासूनच त्यांना सहकार्य केले
कोल्हापूर : गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांकडून केवळ राजकीय सोयीसाठी संचालकांची संख्या 21 वरुन 25 करण्याचा घाट सुरु असल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तसेच पोटनियम दुरुस्ती दरम्यान त्यांचे लोक दंगा करतात. आम्ही शांत राहून सहकार्य केले पण गोंधळ करण्यासाठी लोक घेऊन येणं योग्य नसल्याचा आरोप संचालिका महाडिक यांनी केला.
संचालिका महाडिक म्हणाल्या, गोकुळमध्ये कारभार पूर्वीप्रमाणेच रेटून न्यायचा असेल तर हे चुकीचे आहे. विषय पत्रिकेवरील नऊ नंबरच्या विषयाला माझा विरोध होता. त्यांना 21 चे 25 संचालक का करायचे आहेत हे समजलेले नाही. त्यांनी संचालक संख्या का वाढवयाची आहे हे सर्व सभासदांना समजून सांगणे आवश्यक आहे. पण सर्वांना सामावून घेण्यासाठी संचालक संख्या वाढ करत असल्याचे पूर्वीचेच उत्तर आज दिले आहे.
त्यांच्याकडून सविस्तर उत्तर अपेक्षित होते. ते जोपर्यंत सभासदांपर्यंत संचालक संख्या वाढीची स्पष्टता देत नाहीत, तो पर्यंत याला आपला विरोधच राहणार आहे. त्या पुढे म्हणाल्या, वरिष्ठ पातळीवरुन ठरल्याप्रमाणे आम्ही सभेच्या सुरुवातीपासूनच त्यांना सहकार्य केले. सभेमध्ये आमचे कार्यकर्ते शांतपणे आले.
त्यांनी कोणताही गोंधळ केला नाही. मात्र विषय मंजुरीच्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दंगा करण्यास सुरुवात केली. दंगा करण्यासाठी माणसं घेऊन येणे हे कितपत योग्य आहे. अहवाल वाचन त्यांनी केवळ एक मिनिटात संपवले. यावर कोणाला बोलू दिले नाही.
त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे पळपुटेपणा आहे. त्यांच्याकडुन अजून लेखी उत्तर मिळालेले नाही. ते जरा मला हट्टी म्हणत असतील तर हट्ट पूर्ण झाल्याशिवाय विषय सोडणार नसल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. अजुन बरीच प्रक्रिया संचालक संख्या वाढीस सभेमध्ये मंजूरी मिळाली म्हणजे ती झाली असे नाही. त्याला अजून पुढे बरीच प्रक्रिया आहे. वाढ का आवश्यक आहे हे जोपर्यंत ते स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत विरोध राहणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.