इराणला प्रत्युत्तर द्यावे की नको?
मध्यपूर्वेतील अनेक देशांसमोर यक्षप्रश्न : इस्रायलसोबत नसल्याची करावी लागतेय धडपड
इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी कतार, कुवैत, सौदी एरबिया, संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन यासारख्या देशांना लक्ष्य केले. दुबईत इराणच्या क्षेपणास्त्र अन् ड्रोन हल्ल्यात जीवितहानी झाली. रियाधमध्येही अनेक जण जखमी झाले आहेत. ज्यानंतर आखाती देशांमध्ये इराणवरून प्रचंड संताप आहे. सौदी अरेबिया आणि युएईने इराणला प्रत्युत्तरादाखल कारवाईवरून इशारा दिला आहे. परंतु या देशांनी इराणवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केल्यास ते इस्रायलच्या बाजूने लढत असल्याचे चित्र निर्माण होणार आहे. याचमुळे या देशांनी आतापर्यंत या संघर्षात उडी घेणे टाळले आहे.
मध्यपूर्वेतील लोक आणि राजकीय नेत्यांना मनामा, दोहा आणि दुबईवर बॉम्बफेक पाहणे तितकेच विचित्र अन् अकल्पनीय आहे, जितके अमेरिकन्ससाठी शार्लेट, सिएटल किंवा मियामीवर बॉम्बवर्षाव पाहणे असे उद्गार न्युयॉर्क युनिव्हर्सिटी, अबुधाबीमधील मध्यपूर्व राजकारणाच्या प्राध्यापिका मोनिका मार्क्स यांनी काढले आहेत.
दुबई अन् कुवैतमध्ये नुकसान
दुबईतील प्रसिद्ध इमारती आणि विमानतळ, मनामातील उंच इमारती तर कुवैतच्या विमानतळावर क्षेपणास्त्रs आदळली आहेत. दोहा येथील काही भागांमध्येही ड्रोन हल्ले झाले आहेत. इराणने सौदी अरेबियाच्या रियाध आणि त्याच्या पूर्व भागावरही हल्ला केला आहे. कतार येथील हल्ल्यात 16 जण जखमी झाले आहेत. तर ओमानमध्ये 5, कुवैतमध्ये 32 आणि बहारीनमध्ये 4 नागरिक इराणच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
युद्ध रोखण्यास अपयश
आखाती देश हा संघर्ष इच्छित नव्हते. हल्ल्यापूर्वी ओमान हा देश अमेरिका आणि इराण दरम्यान अप्रत्यक्ष चर्चेत थेट मध्यस्थी करत होता. तसेच ओमानचे विदेशमंत्री बद्र अलबुसैदी यांनी शांतता होणार असल्याची घोषणा होती. संपृक्त यूरेनियमचा साठा कधीच करणार नसल्याची तयारी दाखवत इराणने स्वत:कडील संपृक्त यूरेनियमचे प्रमाण कमी करण्यास होकार दिल्याचा दावा अलबुसैदी यांनी केला होता. गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या देशांनी हे युद्ध रोखण्यासाठी भरपूर प्रयत्न केल्याचे मार्क्स यांनी सांगितले.
हल्ल्याचे धाडस करू शकणार का?
अरब देशांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केल्यास इराण आणखी तीव्र हल्ले चढविण्याची शक्यता आहे. इराणचे पुढील काळातील हल्ले हे नागरी सुविधा, पॉवर ग्रिड, वॉटर डीसेलिनेशन प्रकल्पावर होऊ शकतात. इराणची क्षेपणास्त्रs या देशांसाठी अत्यंत अधिक धोकादायक ठरू शकतात. सौदी अरेबिया आणि दुबईत अनेक गगनचुंबी इमारती आणि पायाभूत प्रकल्प आहेत, यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हे देश इराणसोबत थेट संघर्ष टाळत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.