रेल्वे प्रवाशांचा शॉर्टकट ठरतोय जीवघेणा
फूट ओव्हरब्रिजअभावी गैरसोय : ओव्हरब्रिजचे काम रखडले; प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वेरुळावरून करताहेत ये-जा
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकात रेल्वेरुळावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. फूट ओव्हरब्रिजचे काम रखडल्यामुळे प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वेरुळावर उतरत आहेत. विशेषत: सकाळी व संध्याकाळच्या वेळेला रुळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एखाद्या वेळेला दुसऱ्या रुळावरून वेगाने गाडी आल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेरुळावरील प्रवास वेळीच थांबविणे गरजेचे आहे. सोमवारी मुंबई येथे लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा बळी गेला. तसेच रेल्वेरुळावरून प्रवास करणाऱ्यांचे जीव जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बेळगाव रेल्वेस्थानकातील फूट ओव्हरब्रिजचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. सध्याचा फूट ओव्हरब्रिज हा रेल्वेस्थानकाच्या एका बाजूला असल्याने नागरिकांना चालत जाऊन फूट ओव्हरब्रिजचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे महिला, तसेच वयोवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत.
ये-जा करण्यास फूट ओव्हरब्रिज दूर होत असल्याने नागरिकांकडून रेल्वेरुळावरून प्रवास करण्याचा शॉर्टकट वापरला जात आहे. यामुळे जीव धोक्यात घालून प्रवासी रुळावर उतरून प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला पोहोचत आहेत. सकाळी व सायंकाळी रुळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक प्रमाणात असते. फूट ओव्हरब्रिज दूर असल्याने रेल्वे पोलिसांनाही प्रवाशांवर कारवाई करणे अवघड होत आहे. फूट ओव्हरब्रिजचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. फूट ओव्हरब्रिजसाठी टाकण्यात आलेले लोखंड गंजू लागले आहे. परंतु कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी काम लवकर पूर्ण करण्याची सूचना केली होती. त्यामुळे फूट ओव्हरब्रिजचे काम केव्हा पूर्ण होणार, हे पहावे लागणार आहे.
निष्पाप प्रवाशांचा जीव गेल्यानंतरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का?
सोमवारी रात्री एक एक्स्प्रेस रेल्वेस्थानकातून निघत होती. त्यातून उतरलेले प्रवासी दुसऱ्या रेल्वेरुळावर धावत येत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याचवेळी दुसऱ्या रेल्वेरुळावरून एखादी अन्य बेळगावमध्ये न थांबणारी एक्स्प्रेस वेगाने निघून गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे निष्पाप प्रवाशांचा जीव गेल्यानंतरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.