Satara News : कार्वे परिसरात ऊसतोड कामगारांची टंचाई, उसाला मोठ्या प्रमाणात तुरे
कार्वे भागात ऊस उभाच, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
कार्वे : कार्वेसह परिसरात ऊसतोड कामगारांच्या कमतरतेमुळे वेळेत उसाची तोड न झाल्याने उसाला मोठ्या प्रमाणात तुरे येऊ लागले आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उसाची पूर्ण बाढ होऊनही तुरे आल्यामुळे वजन घटत असून साखर उताऱ्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
चालू वर्षी वेळेवर पाऊस आणि मुबलक पाणी मिळाल्याने उसाचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र, तोडणी लांबल्यानेउसाला तुरे आल्याने प्रतिटन बजनात घट होत आहे. परिणामी तोडणीवेळी अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिकनुकसान होत आहे. ऊसतोड कामगारांची तीव्र कमतरता ही या समस्येचे मुख्य कारण ठरत आहे.
कामगार उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस उभा असलेला दिसत आहे. काही ठिकाणी यांत्रिक पद्धतीने ऊसतोड सुरू असली तरी सर्व शेतकऱ्यांना हा पर्याय परवडणारा नाही. यंत्राद्वारे ऊसतोडीमुळे वेळ वाचत असली तरी वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. परिसरात साखर कारखाना असतानाही या समस्येकडे गांभीयाने पाहिले जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. तुरे लागलेल्या उसासाठी विशेष धोरण आखणे, ऊसतोड कामगार तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत.