दसरा पूजनामध्ये उसांचा तुटवडा
शहरालगतच्या मळ्यांमध्ये नागरिकांची धाव
बेळगाव : खंडेनवमी तसेच दसऱ्याला पूजेसाठी उसाची मागणी असते. घरगुती पूजेसह वाहनांना ऊस बांधून सजावट केली जाते. यावर्षी ऊस दाखल झाले, परंतु शेवटच्या क्षणी उसांची कमतरता भासल्याने अखेर नागरिकांना थेट उसाच्या मळ्यामध्ये जाऊन ऊस खरेदी करावे लागल्याने शहरालगतच्या उसाच्या मळ्यांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले. दसऱ्यात आयुध पूजनाबरोबरच खंडेनवमीला उसाची आरास केली जाते. त्यामुळे परिसरातील ऊस विक्रेते शहरात ठिकठिकाणी विक्री करतात. शहराच्या मुख्य भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस विक्रेते दाखल झाले होते. परंतु, मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने उसाची कमतरता भासली. ऊस कमी असल्याने दसऱ्यादिवशी सकाळी 500 रुपयांना पाच ऊस या भावाने उसांची विक्री केली गेली. परंतु, ते देखील ऊस मिळत नसल्याने अखेर शहरालगतच्या उसाच्या मळ्यांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत होती. शेतकऱ्यांनी मळ्यातूनच उसाची विक्री सुरू केली. यामुळे अनगोळ, जुनेबेळगाव, सांबरा रोड या परिसरात उसाच्या मळ्यांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.