इचलकरंजीत 500 रुपयांच्या मुद्रांकाचा तुटवडा
विक्रेत्यांचा विक्री बंदचा निर्णय
नोंद वह्या दुय्यम निबंधक कार्यालयात केल्या जमा
इचलकरंजी
येथील उपकोषागार कार्यालयात पाचशे रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा भासल्याने कोल्हापूर जिल्हा मुद्रांक व्यावसायिक संघटनेने मुद्रांक विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून संघटनेच्या सदस्यांनी हा निर्णय अंमलात आणला असून, मुद्रांक विक्रीच्या नोंद वह्या दुय्यम निबंधक कार्यालयात जमा केल्या आहेत.
उपकोषागार कार्यालयात 500 रुपयांचे मुद्रांक उपलब्ध नसल्याने 100 रुपयांचे किमान 300 मुद्रांक खरेदी करण्यास विक्रेत्यांवर सक्ती केली जात आहे. सुरुवातीला त्यांनी या अटीचा स्वीकार केला, मात्र वारंवार होणाऱ्या सक्तीमुळे 100 रुपयांचे मुद्रांक मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिले असून त्याला ग्राहकांकडून कमी मागणी आहे. त्यामुळे 500 रुपयांचे मुद्रांक उपलब्ध होईपर्यंत विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेचे संजय घोरपडे, प्रदीप देशपांडे, बी. एन. पाटील, विश्वनाथ घाटगे, विजय हावळ, श्रीकांत हणबर, सी. बी. पाटील, शिवशांत चौगुले, ज्ञानेश्वर कोपार्डे, दिलीप गजांकुश, स्मिता जाधव, सुनिता मोरबाळे यांच्यासह अन्य सदस्यांनी मुद्रांक विक्रीच्या नोंद वह्या कार्यालयात जमा केल्या.