राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा?
बेळगाव : राज्यातील सरकारी रुग्णालयांतून निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने विविध प्रकारच्या 250 औषधांचा तुटवडा रुग्णालयांना भासत आहे. अल्बुमिनी, अॅम्प्लिलीन, लेवोथेयरॉक्सीन, पॅरासिटामोल, न्यूस्टोजीमाईन, सब्लोटोमल यासारख्या औषधांचा रुग्णालयांना पुरवठा झालेला नाही. मात्र आरोग्य खात्याने रुग्णालयांना औषधांचा तुटवडा नसल्याचे म्हटले आहे. राज्य वैद्यकीय औषध पुरवठा निगममार्फत औषधांच्या खरेदीसाठी निविदा मागण्यास विलंब झाला आहे. मात्र 44 प्रकारची विविध औषधे व अन्य काही महत्त्वाची औषधे स्थानिक पातळीवरच खरेदी करण्यास रुग्णालय व्यवस्थापनांना अनुमती दिली असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. तातडीच्या औषधांचा संग्रह रुग्णालयात आहे. 70 टक्के औषधे रुग्णालयात उपलब्ध असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधांची टंचाई नाही
बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधांची टंचाई नाही. जर ठराविक औषधे उपलब्ध नसतील तर स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तशी गरज सध्या तरी भासत नाही. परंतु जर एखाद्या रुग्णासाठी आवश्यक औषधे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नसली आणि जर तो रुग्ण बीपीएल कार्डधारक असेल तर आम्ही स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करतो. मात्र अशी परिस्थिती सध्या तरी नाही. रुग्णांना औषधांचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घेत आहोत.
-डॉ. अशोककुमार शेट्टी (वैद्यकीय संचालक, बिम्स)