दक्षिण गोव्यात इस्पितळांची आबाळ संपणार : मुख्यमंत्री
महिन्याभरात होणार आवश्यक कर्मचारी भरती
पणजी : दक्षिण गोव्यातील विविध इस्पितळांमध्ये डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता दूर करण्यासाठी येत्या महिन्याभरात कर्मचारी भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी मंत्रालयात काल बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सदर माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, दक्षिण गोव्यातील संबंधित आमदार आणि आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत खास करून दक्षिण गोव्यातील सरकारी हॉस्पिटलांमधील कर्मचारी आणि साधनसुविधांची कमतरता भरून काढून दर्जा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रारंभी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ तसेच काणकोण आणि केपे येथील इस्पितळांतील सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता, तसेच अन्य अत्यावश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली.
ग्रामीण भागातील रुग्णवाहिका वाढविण्यावर भर
सध्या ग्रामीण भागातील लोकांसाठी रुग्णवाहिका ही अत्यंत उपयुक्त सुविधा ठरू लागली आहे. मात्र अनेक भागांमध्ये या रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे ही सेवा वाढविण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. त्याचबरोबर सर्व सरकारी इस्पितळांच्या रुग्णवाहिका 108 सेवेकडे जोडण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.