गृहज्योतीमुळे तक्रार निवारण बैठकीला अल्पप्रतिसाद
बेळगाव : गृहज्योती योजनेमुळे नागरिकांना मोफत वीज मिळू लागल्याने तक्रारींचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. हेस्कॉमकडून तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली. परंतु काही मोजकेच ग्राहक उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडत आहेत. गृहज्योती योजनेमुळे वीजबिलातील वाढ होण्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हेस्कॉमच्या प्रत्येक उपकेंद्रावर तक्रार निवारण बैठक घेतली जाते. यावेळी विजेसंदर्भातील तक्रारी मांडल्या जातात. शनिवारी नेहरूनगर येथील कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी एकूण 7 तक्रारी मांडण्यात आल्या. सह्याद्रीनगर, कणबर्गी, ज्योतीनगर, विश्वेश्वरय्यानगर, शिवाजीनगर, सदाशिवनगर व एपीएमसी परिसरातून तक्रारी मांडण्यात आल्या. यामध्ये चेकबॉन्स, बॅकबिलिंग, नवीन कनेक्शन यासह इतर तक्रारी दाखल करण्यात आल्या. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे, जयश्री, लक्ष्मी, शंकर कदम, शितल सनदी, यल्लाप्पा नेजकर यांच्यासह इतर उपस्थित होते.