अल्पजीवी शस्त्रसंधी आणि उपाय
नेहमी होत असते तेच इस्रायल आणि हमास यांच्या शस्त्रसंधीसंबंधी झाले आहे. ते होणारच होते. साधारणत: दोन महिन्यांपूर्वी ही शस्त्रसंधी लागू झाली. आजवर ती अनेकदा झाली आहे. तथापि, एकदाही या शस्त्रसंधीचे मूळ उद्दिष्ट्या साध्य झालेले नाही. मुळात हमास आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षाची कारणेच अशी आहेत, की शांततेसंबंधी कोणीही कितीही आशावाद बाळगला तरी तो फोलच ठरतो. तसेच, पॅलेस्टाईनचे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र निर्माण होईल आणि पॅलेस्टाईन आणि इस्रायल ही दोन्ही स्वतंत्र राष्ट्रे, शांततामय सहजीवन जगू लागतील, हे केवळ एक भ्रामक स्वप्नरंजनच असते. आतापर्यंत अनेकदा असे घडूनही अनेक स्वप्नवाद्यांना हे स्वप्न पडतच राहते. ते भंग पावले की मग त्याचे खापर बहुतेकवेळा बहुतेक स्वप्नाळू विचारवंत इस्रायलवरच फोडतात. ताज्या स्वप्नभंगानंतरही असेच घडत आहे. शस्त्रसंधी चालू असताना इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला केला. त्यात 400 हून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांना प्राण गमवावे लागले. इस्रायलने असा हल्ला करावाच कशासाठी? हल्लाच करायचा तर त्याने तो केवळ दहशतवाद्यांवर करावा. सर्वसामान्यांना का मारले जात आहे? असे साळसूद मुद्दे काही विचारवंतांना आता सुचत आहेत. इस्रायलने हल्ला केला याचा अर्थ इस्रायलनेच शस्त्रसंधी मोडली, असे विश्लेषण सरसकटपणे आणि सवंगपणे हे विचारवंत करतात. तथापि, टाळी एका हाताने वाजत नाही. गेल्या साधारणत: दीड वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात जो संघर्ष होत आहे, त्याचे एकमेव कारण, 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर जो निर्घृण आणि क्रूर हल्ला केला आणि हजाराहून अधिक निरपराध ज्यूंची ह
त्या केली तसेच अनेकांचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवले, हेच आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलची जितकी हानी झाली असेल, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ती हमासची आणि पॅलेस्टाईन नागरिकांची होणारच होती. कारण इस्रायल स्वस्थ बसणारच नव्हता. हमासचे दहशतवादी सर्वसामान्य पॅलेस्टाईन नागरिकांची ढाल बनवून त्यांच्या आडून इस्रायलवर हल्ले चढवितात. सर्वसामान्य पॅलेस्टाईन नागरिकही स्वत:ची अशी ढाल बनवू देतात. ते स्वत: त्यांच्यातीलच दहशतवाद्यांना विरोध करत नाहीत. आपल्या हलाखीच्या आणि अस्थिर जीवनासाठी आपल्यातलेच दहशतवादी जबाबदार आहेत, हे ओळखण्याची त्यांची तयारी नाही. अशा स्थितीत जेव्हा सर्वसामान्यांमध्ये मिसळून दहशतवादी त्यांचा कार्यभाग साधू पाहतात, तेव्हा दुसऱ्या बाजूने काय करावे अशी अपेक्षा असते? सर्वसामान्यांना वगळून त्यांच्यातच मिसळलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणे अशक्य आहे. अशावेळी दुसऱ्या बाजूकडे दोन पर्याय असतात. आपण कारवाई केल्यास सर्वसामान्य माणसांचे प्राण जातील, अशा भावनेने स्वस्थ राहणे हा पहिला पर्याय असतो. मात्र, तो उपयोगात आणल्यास दहशतवादी शिरजोर होतात. दुसरा पर्याय प्रत्यक्ष कारवाईचा असतो. तो स्वीकारल्यास सर्वसामान्य माणसांची हानी होणे अपरिहार्य असते. इस्रायलला हा दुसरा पर्याय स्वीकारणे भाग पडले आहे. हा पर्याय समर्थनीय किंवा सर्वोत्तम नसला, तरी तोच अपरिहार्य आहे. हमास किंवा मध्यपूर्वेतील अन्य दहशतवादी संघटनांना इस्रायलचे अस्तित्वच नको आहे. केवळ दहशतवादी संघटनांनाच नव्हे, तर या प्रदेशातील अनेक इस्लामी देशांनाही इस्रायलचे अस्तित्व खुपते. या शक्ती इस्रायलचे अस्तित्व स्वीकारुन त्यांच्याशी शांततेने राहतील ही शक्यता दुरापास्त आहे हे अनेकदा सिद्ध झालेले नाही काय? या देशांनी इस्रायलला संपविण्याचा प्रयत्न थेट युद्धाच्या माध्यमातून किमान चार वेळा करुन पाहिला आहे. तथापि, त्यांना मार खाऊन परतावे लागले आहे. त्यामुळे आता हेच देश स्वत: युद्ध न करता, दहशतवादी संघटनांना पोसून, त्यांना पैसा आणि शस्त्रबळ पुरवून आणि त्यांना पुढे करुन इस्रायलला चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही वस्तुस्थिती अनेकदा स्पष्टपणे समोर आली आहे. त्यामुळे इस्रायलला आपल्या अस्तित्वासाठी आणि संरक्षणासाठी अशी कारवाई करावी लागते आणि तशी ती करण्याचा त्याला अधिकारही आहे. इस्रायलच्या शेजाऱ्यांना जर संधी मिळते तर ते इस्रायल आणि तेथील ज्यू लोक यांची कशी अवस्था करुन टाकतील, याची एका छोटी झलकच खरे तर 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यातून दिसून आली आहे. परिणामी, आपले अस्तित्व टिकविण्याचा आणि आपल्या ज्यू व इतर नागरिकांचे संरक्षण करण्याचा हा एकच मार्ग इस्रायलपाशी आहे. हमाससारख्या संघटनांना सहानुभूती दर्शविताना किंवा सर्वसामान्य पॅलेस्टाईन नागरिकांचा विचार करताना, विचारवंतांनी इस्रायलची बाजू समजावून घेणेही आवश्यक नाही काय? पण तसे होताना दिसत नाही. विश्लेषणे एकांगी पद्धतीने केली जात आहेत. हा संघर्ष दूरुन पाहणाऱ्या जगातील इतर नागरिकांची दिशाभूल करण्याचाच हा प्रयत्न आहे. खरे तर, 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापूर्वी त्या भागात बऱ्यापैकी शांतता बराच काळ होती. हिंसक संघर्षाची वृत्ते फारशी येत नव्हती. पण दहशतवाद्यांना शांतता नकोच असल्याने त्यांनी इस्रायलवर विनाकारण हल्ला करुन स्वत:वर आणि आपल्याच सर्वसामान्य नागरिकांवर कुऱ्हाड मारुन घेतली. तेव्हा प्राप्त परिस्थितीत शांतता निर्माण होण्याचा एकच मार्ग दिसतो. हमासने इस्रायल आणि इतर देशांच्या सर्व ओलीसांची सुटका करावी. तसेच सर्वसामान्य पॅलेस्टाईन नागरिकांनी दहशतवाद्यांची ढाल बनू नये. दहशतवाद्यांना त्यांच्याच समाजाकडून विरोध झाल्याशिवाय त्यांच्यावर दबाव येणार नाही. तसेच, पॅलेस्टाईनची सत्तासूत्रे नेमस्त आणि शांततावादी सरकारकडे जाणे आवश्यक आहे. या सरकारने इतर शेजारी देशांचे बाहुले बनण्याचे टाळले पाहिजे. इस्रायल हे लोकशाही राष्ट्र आहे. तेथे सत्तापालट सनदशीर मार्गाने निवडणुकीच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे तेथील सत्ताधीश कोणत्याही पक्षाचे असले तरी, तेथील जनतेच्या दबावात असतातच. पण पॅलेस्टाईनची स्थिती तशी नाही. म्हणून, इस्रायलकडून ज्यांना संयम आणि शांततेची अपेक्षा आहे, त्यांनी हीच अपेक्षा पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना आणि त्यांना पोसणारे इतर देश यांच्याकडूनही ठेवली पाहिजे. तशी ती उघडपणे व्यक्तही केली पाहिजे. केवळ एकाच बाजूवर अनाठायी वैचारिक आघात करुन काहीही सध्या होणार नाही, हे लक्षात घ्यावे.